उत्तर भारतीय समाज हा कल्याण डोंबिवली परिसरात पूर्वपरंपरा राहत आहे. नोकरी-व्यवसाय करून राहत असलेल्या या समाजाची जिल्ह्यातील संख्या आता वाढली आहे. त्यामुळे उत्तर भारतीय समाज हा आमच्या पक्षाचा पाठीमागे आहे असे कोणा राजकीय पक्षाने यापुढे गृहीत धरू नये. प्रसंगी आम्ही आमचा नगरसेवकच काय आमदारही निवडून आणू शकतो, असा विश्वास हिंदीभाषिक जनता मंचचे अध्यक्ष विश्वनाथ दुबे यांनी डोंबिवली मध्ये व्यक्त केला. डोंबिवलीतील सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात हिंदी भाषिक जनता मंचचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत उत्तर भाषिक समाज मोठा असला तरी या समाजाच्या राजकीय मंडळींना पालिका निवडणूक आली की उमेदवारीसाठी नेत्यांकडे भीक मागावी लागते, अशी खंत दुबे यांनी व्यक्त केली. या समाजाच्या ताकदीचा विचार करून यापुढे अशी भीक आम्ही मागणार नाही,असा सूचक इशारा विश्वनाथ दुबे यांनी शिवसेना-भाजपचा नामोल्लेख न करता दिला.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर भाषिक समाजासाठी पालिका निवडणुकी सहा जागा देण्याचे कबूल केले आहे, त्यामुळे तो शब्द कसा पाळला जातो याकडे आमचे लक्ष असेल आणि तो पाळला जाईल, असा आमचा विश्वास आहे असे दुबे म्हणाले.
आतापर्यंत काँग्रेसने आम्हाला नेहमीच प्रतिष्ठेची वागणूक दिली. प्रत्येक पक्षाने आम्हाला गृहीत धरून निवडणुकीच्या काळात आमच्या मतांचा उपयोग करून घेतला. उत्तर भाषिक समाज आता जागृत झाला आहे. या समाजाला गृहित धरण्याचे राजकीय पक्षांचे दिवस आता निघून गेले आहेत. आतापर्यंत आमच्याकडे काँग्रेसचा समर्थक म्हणून पाहिले गेले, परंतु उत्तर प्रदेशात आता झालेल्या निवडणुकीत काय चमत्कार घडला ते जनतेने पाहिले. त्यामुळे आमची ताकद काय आहे ते राजकीय पक्षांना समजली असेल, असे दुबे म्हणाले. या कार्यक्रमाला आमदार रवींद्र चव्हाण, भाजपाचे नगरसेवक जालिंदर पाटील व इतर उत्तर भाषिक नेते पदाधिकारी उपस्थित होते.