शहापूर तालुक्यातील शेणवे गावात गेल्या ७२ वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती आणि पीर शादावल सय्यद शावली बाबांचा उत्सव एकत्रितपणे साजरा केला जातो. या उत्सवांना कोणतीही धार्मिक किनार न देता गावातील वातावरण एकोप्याचे राहावे, या उद्देशाने १९४४ मध्ये गावातील तत्कालीन हिंदू, मुस्लीम समाजातील ज्येष्ठ मंडळींनी संघटित होऊन हा एकत्रित उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. आता गावातील तिसरी पिढी हनुमान जयंती व पीर बाबाचा उत्सव गुण्यागोविंदाने साजरी करीत आहे. २२ व २३ एप्रिलला हा दोन दिवसांचा उत्सव साजरा होत आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील शेणवे हे गाव या धार्मिक एकोप्यासाठी प्रसिद्ध आहे. गावात बाराबलुते पद्धतीचा समाज वर्षांनुवर्ष राहत आहे. मुसलमान समाजातील नागरिकांची संख्याही मोठी आहे. व्यापार हा स्थानिक मुस्लीम समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. या गावात एकोप्याचे वातावरण असावे; कधी कोणता जातीय वितंडवाद निर्माण होऊ नये; गावातील शांतता भंग होऊ नये म्हणून हिंदू-मुस्लिमांनी एकत्रित उत्सव साजरा करावा, असा विचार पुढे आला. १९४४ मध्ये शेणवे गावातील रामचंद्र शिर्के, कृष्णा निपुर्ते, शंकरशेठ पातकर, भास्कर मंडलिक, अब्दुल सय्यद, इब्राहिम शेख, शंकर रामा वरकुटे, नारायण पडवळ यांनी गावकीची बैठक घेतली. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिर व पीर शादवल सय्यद शावली बाबाचा दर्गा यांचा उत्सव एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुसलमानांचा हिजरी कालगणनेनुसार पीर बाबाचा उत्सव हा पौष (मार्च) महिन्यात येत होता. हनुमान जयंती त्यानंतर एक महिन्यांनी येत होती. यामुळे हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती येईल, त्या दिवशी हनुमानाचा उत्सव व त्याच्या दुसऱ्या दिवशी पीर बाबाचा उत्सव (संदल-मिरवणूक) साजरा करण्यावर ज्येष्ठांच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. मुस्लीम समाजाच्या मंडळींनी एकत्रित उत्सव साजरा करण्यास अनुमती दिली. या बैठकीचे इतिवृत्त व उत्सव साजरा करण्यासाठी करण्यात आलेला करारनामा आजही गावातील मंडलिक कुटुंबीयांच्या दस्तऐवजात उपलब्ध आहे, असे ग्रामस्थ पुंडलिक शिर्के यांनी सांगितले.

करारनाम्यानुसार एकत्रित वर्गणीतून उत्सव
उत्सवाच्या करारनाम्यानुसार गावातील एकत्रित वर्गणीतून हे दोन्ही उत्सव साजरे केले जातील. पीर बाबाच्या उत्सवासाठी येणाऱ्या वाद्यवृंदाने पहिला मान हनुमान मंदिरासमोर देऊन तेथे दोन गाणी वाजवावीत. पहिल्या दिवशी हनुमान जयंती व दुसऱ्या दिवशीचा पीर बाबाचा संदल (मिरवणूक) ग्रामस्थांनी गावचा उत्सव म्हणून साजरा करावा. ७२ वर्षांपूर्वी झालेल्या या कराराप्रमाणे या दोन्ही दिवशीच्या उत्सवात आजही गावातील हिंदू, मुस्लीम समाजातील ग्रामस्थ एकत्रितपणे दोन दिवसांचा उत्सव साजरा करतात.

Story img Loader