कुटुंबाची धुरा सांभाळता सांभाळता महिला देशाच्या सर्वोच्च ठिकाणी जाऊन पोहोचल्या आहेत. सर्वच क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत. त्याचाच प्रत्यय गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनातही येतो आहे. गेल्या १३ वर्षांची परंपरा असलेल्या अंबरनाथच्या स्वागतयात्रेची संपूर्ण धुरा आता महिलांच्या हाती गेल्याने एक सकारात्मक संदेश त्यानिमित्त समाजात पसरतो आहे.
नववर्ष स्वागतयात्रा म्हटल्या की सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक गोष्टींचा त्यात भरणा असतो. मात्र अंबरनाथकरांना यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत नारी शक्तीचा जागर दिसणार आहे. नववर्ष स्वागतासाठीच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असून यात महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यात महिलांच्या बाईक रॅलीचे विशेष आकर्षण असणार आहे. यावेळी पारंपरिक वेशभुषेतील महिला पारंपरिक संगीतासोबतच झुंबा नृत्यप्रकारावरही ठेका धरताना दिसणार आहेत. आपापल्या काळात कर्तुत्व गाजवणाऱ्या महिला, राजे-राणी, प्रसिद्ध महिला राजकारणी यांच्या वेषातील महिलाही यात्रेत सहभागी होणार आहेत.
स्वामी समर्थ मठापासून सुरू होणाऱ्या या स्वागत यात्रेत महिलांचे लेझीम पथकही सहभागी होणार असून या महिला स्वयंस्फूर्तीने लेझीम पथकात सामील झाल्या आहेत, अशी माहिती स्वागत समितीच्या अध्यक्षा संध्या म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच शिवराज प्रतिष्ठानच्या ढोल पथकात महिलांचाही सहभाग असणार आहे.