लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात देशाच्या विविध भागातील २७ पर्यटकांचा बळी गेला. यामध्ये एका स्थानिक काश्मिरी मुस्लिम नागरिकाचाही मृत्यू झाला. या भ्याड कृत्याचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी कल्याणमधील घासबाजार मधील कल्याण सिटीजन फोरमतर्फे हिंदु, मुस्लिम नागरिक यांचे शनिवारी (ता. २७) एकत्रित आत्मक्लेश उपोषण आयोजित करण्यात आले आहे.

कल्याण पश्चिमेतील पारनाका येथील चौकात शनिवारी सकाळी १० ते संध्याकाळी पाच वेळेत हे आत्मक्लेश उपोषण सुरू राहणार आहे. कल्याण सिटीजन फोरमचे सामाजिक कार्यकर्ते किशोर खराटे, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफ्फार शेख यांच्यासह अनेक हिंदु, मुस्लिम नागरिक एकत्रितपणे या उपोषणात सहभागी होणार आहेत.

दहशतवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध आणि ही प्रवृत्ती सरकारने समुळ उखडून टाकावी या मागणीसाठी हे आत्मक्लेश उपोषण आहे. या उपोषणाच्या माध्यमातून पहलगाम बेसरन पठारावरील दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे. कल्याण शहराच्या विविध भागातील, क्षेत्रातील नागरिक या आत्मक्लेश उपोषणात सहभागी होतील, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते किशोर खराटे यांनी व्यक्त केला.

पहलगाम येथील हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असला तरी हा हल्ला दहशतवाद्यांनी भारत देशाच्या प्रत्येक नागरिकावर, आत्म्यावर केलेला हल्ला आहे. त्यामुळे या हल्ल्याचा कठोरात कठोर पध्दतीने निषेध व्हावा यासाठी हे आत्मक्लेष उपोषण करण्यात येत आहे. कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील नागरिकांनी या उपोषणात सहभागी होऊन आपल्या ऐक्याची शक्ती आपण विघातक शक्तींना दाखवून देऊ, असे अब्दुल शेख यांनी सांगितले.