हिंगे ब्रदर्स, बदलापूर
आधुनिकीकरणाने जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असलेली संगीत कलाही त्याला अपवाद नाही. इलेक्ट्रॉनिक वाद्यांद्वारे हवे तेव्हा सप्तसूर उपलब्ध होत असले तरी पारंपरिक वाद्यांतून निघणाऱ्या नैसर्गिक सुरांची मोहिनी अजूनही कायम आहे. त्यामुळेच वाट्टेल ती सुरावट एका कळीनिशी उमटविण्याची क्षमता असणाऱ्या सिंथेसायझरच्या जमान्यातही पारंपरिक हार्मोनियम अथवा पेटी संगीत मैफलींमधील आपले स्थान टिकवून आहे. दीडशे वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या सुरांच्या पेटीला शास्त्रीय बैठकीत मानाचे स्थान मिळवून देण्यात बदलापूरमधील हिंगेबंधूंचे फार मोठे योगदान आहे. हार्मोनियम दुरुस्ती आणि निर्मिती क्षेत्रात सध्या ‘हिंगे’ भारतातील एक प्रमुख उत्पादक म्हणून गणले जातात. राजेंद्र आणि जितेंद्र हिंगे हे दोन भाऊ गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारच्या वाद्यांची निर्मिती करीत असले तरी प्रामुख्याने हिंगे म्हणजे हार्मोनियम असे समीकरणच बनले आहे.
हिंगे कुटुंबीय मूळचे पुण्यातील राजगुरू नगरचे. तिथे कृष्णाजी हिंगे यांचा खाद्यतेल निर्मितीचा व्यवसाय होता. राजेंद्र आणि जितेंद्र या त्यांच्या दोन्ही मुलांनी मात्र सुरांची वाट धरली. त्यांना सुरांचा वारसा, मार्गदर्शन आजोळी मिळाले. त्यांचे आजोबा एकनाथ दसककर ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. दोन्ही मामा संगीत शिक्षक. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजेंद्र आणि जितेंद्र या दोघांनीही सुरुवातीला हार्मोनियम दुरुस्तीचा उद्योग सुरू केला. या विषयातील प्राथमिक शिक्षण त्यांना कृष्णराव दसककर या
डोंबिवलीत राहणाऱ्या मामाकडून मिळाले. यथावकाश त्यांनी मागणीनुसार नवीन हार्मोनियम बनवून देण्यास सुरुवात केली. सर्वसाधारणपणे हार्मोनियम तीन-चार कारागीर मिळून करतात. प्रत्येक कारागीर एकेक सुटा भाग बनवतो. नंतर त्यांची जुळणी केली जाते. एकहाती हार्मोनियमची बांधणी करणारे कारागीर दुर्मीळ आहेत. सुरुवातीच्या काळात हिंगेबंधूंनीही हार्मोनियम बनविण्यासाठी कारागीर ठेवले. मात्र कारागिरांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळून येणारी व्यसनाधीनता आणि अर्धवट शास्त्रीय ज्ञानामुळे हार्मोनियम निर्मितीत त्रुटी राहात असत. हार्मोनियम बनविणाऱ्या अनेकांना ती वाजविता येत नाही. त्यामुळे त्यांना गायक आणि वादकांच्या गरजा लक्षात येत नाहीत. हार्मोनियन निर्मिती उद्योगातील हे वास्तव लक्षात आल्यावर हिंगेबंधूंनी त्यातील हे दोष काढून टाकण्याचे ठरविले. १९८४ मध्ये त्यांनी हार्मोनियम निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. हार्मोनियम दुरुस्ती, निर्मिती तसेच वादन या तिन्ही विषयांतील बारकावे त्यांनी शिकून घेतले. एकीकडे पूर्णवेळ या उद्योगात कार्यरत असताना फावल्या वेळेत त्यांनी त्यांचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले. राजेंद्र यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले तर जितेंद्र बी.एस्सी. झाले. हार्मोनियमव्यतिरिक्त हिंगेबंधू गिटार, सतार, तानपुरा, तबला, मृदुंग, ढोलक, ढोलकी, बुलबुल तरंग, सरस्वती वीणा, दिलरूबा आदी वाद्ये बनवितात. जितेंद्र हिंगे पियानोचे टय़ूनिंग करण्यातही पारंगत आहेत. ‘यामाहा’ कंपनीने उत्कृष्ट टय़ूनर म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
सुरांच्या पेटीला सुसंवादाची साथ
आधुनिकीकरणाने जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
Written by प्रशांत मोरे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-01-2016 at 00:43 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hinge brothers harmonium business