‘नारळाची उंचच उंच झाडं’, ‘वांगी-मिरच्यांनी सजलेल्या बागा’..‘विसावा घ्यायला सावलीमय घर’.. असे हे मोहक वर्णन कोकणातल्या किंवा शहरापासून कित्येक मैल लांब असलेल्या गावातील घराचे वाटत असेल ना! हे वाटणेही साहजिकच आहे म्हणा. कारण शहरीकरणाच्या या वेढय़ात आपण आणि निसर्ग यांमधील अंतर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. परंतु निसर्ग आणि माणसातील ओलावा ज्या गावातील घररूपी वास्तूंमुळे कायम राहिला, असे गाव म्हणजे कल्याण. कल्याण गावाला अनेक वाडय़ांनी सजविले, शिवरायांच्या साक्षीने पावन केले म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ‘कल्याणकारी कल्याण’ म्हणून ओळखले जाते. निसर्गाचा ओलावा ऐन घरात अनुभवायला मिळणे, म्हणजे ‘स्वर्ग सुख’च. जे आज हातावर मोजण्याइतक्याच घरांमध्ये अनुभवायला मिळते. या मोजक्या घरांपैकी एक म्हणजे जुन्या कल्याणातील ‘अभ्यंकर वाडा!’
जुन्या कल्याणातील डॉ. मोडक गल्लीत तब्बल ९९ वर्षांपासून इतिहासाची साक्ष देणारा अभ्यंकर वाडा ताठ मानेने उभा आहे. २५ जुलै १९१७ रोजी लक्ष्मीबाई कोम आणि नारायण गोविंद अभ्यंकर हे या वाडय़ात राहात असत. सुरुवातीच्या काळात केवळ तळमजला असणाऱ्या या वाडय़ाला पुढे १९३२ मध्ये पहिला मजला चढविण्यात आला. त्याचप्रमाणे पहिल्या मजल्यावरील अध्र्या भागावर उघडी गच्ची तर उर्वरित भागात खोल्या असे या वाडय़ाचे स्वरूप विस्तारले गेले. अभ्यंकर वाडय़ाचे पूर्ण बांधकाम लोडबेरिंगचे असून त्याकाळी अन्यत्र कोठेही न आढळणारी उघडी गच्ची (ओपन टेरेस) या वाडय़ाचे वैशिष्टय़ आहे. आजच्या टोलेजंग इमारतीच्या युगात प्रत्येकजण या उघडी गच्ची असलेल्या घरासाठी झगडत असतो. परंतु उघडय़ा गच्चीचे कुतूहल जुन्या मंडळींनाही होते, हे यावरून आपल्याला लक्षात येईल.
सुरुवातीला कै. कृष्णाजी मोरेश्वर अभ्यंकर हे एकटेच या प्रशस्त वाडय़ात राहात असत. त्यांचे बंधू कै. रामचंद्र मोरेश्वर अभ्यंकर भिवंडीस नोकरीनिमित्त तर कै. हरी मोरेश्वर अभ्यंकर नोकरीनिमित्त मुंबईस वास्तव्यास होते. वाडय़ात वास्तव्यास असणाऱ्या कै. कृष्णाजी मोरेश्वर अभ्यंकर (कुशाभाऊ) यांना सोबत म्हणून एक बिऱ्हाड तळमजल्यावर तर दुसरे बिऱ्हाड वाडय़ातील धान्याचे कोठार असलेल्या तीन खोल्यांमध्ये वास्तव्यास दिले. कल्याणमधील वाडेघर, बारवी, संतोषी माता रस्ता आदी परिसरात अभ्यंकरांची भातशेती होती. या शेतीतून भातकांडण्यासाठी बैलगाडय़ा वाडय़ावर येत असत. या ठिकाणहून भाजीपालाही मिळत असे. परंतु काळाच्या ओघात हे सर्व गेले. मात्र, अभ्यंकर वाडा मात्र ताठ मानेने या घटनांची साक्ष देत आजही उभा राहिला आहे.
अभ्यंकर वाडा हा चुन्यातून साकारलेला असून वाडय़ाच्या भिंती चौदा इंची जाडीच्या आहेत. कुशाभाऊ अभ्यंकरांचा चुन्याचा व्यवसाय असल्याने चांगल्या प्रतीचे चुन्याचे बांधकाम काय असते, याचा प्रत्यय आजही या वाडय़ामध्ये वावरताना येतो. वाडय़ातील खिडक्यांची रचना समोरासमोर असून या खिडक्या खालती गजांच्या व वरती उघडय़ा आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक खिडक्यांवरील झरोके स्टेनग्लासचे आहेत. वाडय़ाच्या प्रवेशद्वारावर पूर्वी लाकडाची दिंडी होती व तेथूनच एक मध्यात छोटीशी प्रवेशिका होती. त्यातून प्रत्येकाला वाकून यावे लागे; जणू नतमस्तक होऊनच वाडय़ात प्रवेश करावा लागत असे. कालानुरूप ती दिंडी तुटली व तेथे लोखंडाचे प्रवेशद्वार आले.
अभ्यंकर वाडय़ाच्या बाजूला नारळाची पाच झाडे, चिकूचे एक झाड, पेरूचे एक झाड, अशोकाची सहा झाडे आहेत. पूर्वी या ठिकाणी बकुळाची झाडेही होती. त्यामुळे साहजिकच वाडय़ाचा हा परिसर सावलीमय होत असे. वाडा परिसरात साक्षात कोकण उभे राहिल्याचा प्रत्यय आपल्याला येतो. वाडय़ामध्ये जुन्याची दाद देण्यासाठी तुळशीवृंदावनही आहे.
सध्या या ठिकाणी नारळाची झाडे असल्याने वाडय़ात थंडगार वातावरण असते, असे मीना अभ्यंकर सांगतात. वाडय़ातील पुढच्या अंगणात जयंत अभ्यंकर समृद्ध नर्सरी चालवीत आहेत. अभ्यंकर वाडय़ाचे मुख्यत: तीन भाग पडतात. पहिला भाग हा वाडय़ाचा तळमजला. येथे जाण्यासाठी वाडय़ाच्या ओटीवरूनच प्रवेश करावा लागतो. ओटीतून पुढे गेल्यानंतर तीन प्रवेशद्वारे-एक प्रमुख बैठकीच्या खोलीत जाते; दुसरे छोटय़ाशा खोलीत प्रवेश करते; तिसरे बंद खोलीत प्रवेश करते. ही खोली पूर्वी ‘बाळंतीणीची खोली किंवा कोठी’ म्हणून वापरली जाई. आत मध्यात छोटा झोपाळा आहे. त्यानंतर बैठा ओटा, छोटीशी मोरी असे असून त्या स्वयंपाकघराला लागून मागे पडवी आहे. तेथे जुन्या काळचे जमिनीतच उखळीसारखे असून त्याचा पूर्वी कांडणासाठी उपयोग करत असत. वाडय़ामध्ये खोल विहीर होती. त्यावर रहाट होता. त्याच्या पुढे गोठा होता व त्यानंतर टोकाला शौचालयाला जाण्याचा मार्ग होता. आता कालपरत्वे ते सर्व जाऊन तेथे नव्या धाटणीची इमारत उभी आहे. तळमजल्यावर पाच प्रशस्त खोल्या असून त्या प्रत्येक खोलीत भिंतीतील कपाटे, कोनाडे, खुंटय़ा आहेत. वाडय़ाचा दुसरा भाग म्हणजे वाडय़ाचा पहिला मजला. या मजल्याला जाण्यासाठी दोन जिने आहेत. एक बाहेरच्यांना येण्यासाठी आणि एक घरच्यांसाठी अशी त्याची व्यवस्था होती. बाहेरच्यांना येण्यासाठी असणारा जिना थेट दिवाणखान्यात प्रवेश करतो. या ठिकाणी पूर्वीच्या काळात वापरले जाणारे डेक्स आहेत. कुशाभाऊंच्या सावकारीच्या काळात लेखाजोखा मांडण्यासाठी त्याचा वापर केला जाई. त्याचप्रमाणे वाडय़ात असणारा सागवानी झोपाळा आजही वाडय़ाचे आकर्षण ठरतो. वाडय़ात आलेला प्रत्येकजण एकदा तरी या झोपाळ्यावर टेकतो व स्वत:च्या कोकणातील घराची स्मृती मनात घोळवतो. वाडय़ाचा तिसरा भाग म्हणजे वाडय़ाचे आकर्षण असणारी उघडी गच्ची. पूर्वीच्या काळी कोणत्याही लोडबेअरिंग घरात अशा प्रकारची उघडी गच्ची आढळत नसे. या गच्चीचे कठडे सुंदर नक्षीकाम केलेले असून या ठिकाणी धुरांडीचीही रचना दिसते.
पूर्वीच्या काळी वाडय़ाच्या या गच्चीतून कल्याण खाडीचा परिसर आणि खाडीकडे जाणारा दुर्गाडी किल्ल्याचा रस्ता सहज दिसत असे. परंतु आता शहरात उभ्या राहिलेल्या उंचच उंच इमारतींमुळे हे शक्य होत नाही. अभ्यंकर वाडय़ामध्ये कायम कुत्रा पाळलेला आहे. आजतागायत असे एकूण १२ कुत्रे अभ्यंकर कुटुंबीयांनी पाळले आहेत. असे हा कलागुणांनी व व्यवसायांनी ‘समृद्ध’ असलेला अभ्यंकर वाडा आजही प्रेमाची आणि आठवणींची साक्ष देत उभा आहे.