जुन्या कल्याणातील प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये आवर्जून नाव घ्यावे, असे कुटुंब म्हणजे ‘मराठे’ कुटुंब. मराठे कुटुंबीयांच्या सामाजिक कामाच्या ध्यासामुळेच कल्याण गावातील एकही व्यक्ती मराठे कुटुंबीयांना ओळखत नाही, असे आढळणार नाही. जुन्या कल्याणातील सिद्धेश्वर आळी परिसरात ‘मराठे’ वाडा आजही ताठ मानेने उभा आहे.
मराठे वाडय़ात प्रवेश करण्यासाठी एका छोटय़ा प्रवेशद्वारातून प्रवेश करावा लागतो. वाडय़ाच्या या छोटय़ा प्रवेशद्वारातून वाडय़ात प्रवेश केल्यानंतर अचंबित झाल्याशिवाय राहवत नाही, कारण वाडय़ाचे छोटे प्रवेशद्वार प्रथमदर्शनी पाहता आतमध्ये वाडा इतका मोठा असेल, याचा अंदाज वाडा बाहेरून पाहणाऱ्यास येत नाही. आजमितीला एकसंध दिसणारा मराठे वाडा पूर्वीच्या काळी तीन वेगवेगळय़ा वास्तूंमध्ये विभागला गेला होता.
यामध्ये फडके वकिलांची ‘फडके वाडी’, भाताची कोठारे आणि डोलारे यांची मंगलोरी कौलांची वखार यांचा समावेश होता. या तिन्ही वास्तू १९५१ मध्ये कै. परशुराम मराठे यांनी विकत घेऊन त्याचे रूपांतर वाडय़ामध्ये केले. वाडय़ामध्ये सरळ एका रांगेत भाताची ९ कोठारे होती. कै. परशुराम मराठे यांनी फडके वकिलांकडून वाडा विकत घेतल्यानंतर या कोठारांचे रूपांतर घरांमध्ये केले; परंतु या ठिकाणी पूर्वी भाताची कोठारे होती हे कोणताही तज्ज्ञ पाहताक्षणी ओळखू शकेल.
मराठे वाडय़ाचे स्वरूप बैठय़ा घरांसारखे असल्याचे पाहायला मिळते. फडके वाडय़ात अन्य वाडय़ांमध्ये पाहावयास मिळणारे ओटी,माजघर, पडवी, बाळंतिणीची खोली, विटाळशीची खोली आदी भाग दिसत नाहीत. मराठे वाडय़ातील अंगणात नारळ, केळी, चिकू, आंबा अशी निरनिराळी झाडे आजही पाहायला मिळतात. घरातील शुभ कार्यासाठी आजही केळीच्या पानांचा वापर केला जात असल्याचे मराठे कुटुंबीय आवर्जून सांगतात. मराठे वाडय़ात होणारे निरनिराळे सण-समारंभ हाही एक आवर्जून उल्लेख करावा लागेल, असा विषय आहे. बारसे, डोहाळजेवणं, लग्नसमारंभ असे निरनिराळे सण-समारंभ वाडय़ात मंडप घालून मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. चैत्र महिन्यात बायकांनी एकत्र जमून केला जाणारा ‘चैत्रगौर’ सण वाडय़ात मोठय़ा उत्साहात साजरा होत असे. यामध्ये ‘हळदीकुंकू’ समारंभाच्या निमित्ताने महिला एकत्र जमत असत. यामध्ये कैरीचे पन्हे, आंब्याची डाळ यांचा बेत असे. चैत्रगौराची आरासही यानिमित्ताने केली जात असे. या वेळी वाडय़ामध्ये समारंभासाठी येणाऱ्या महिलांना घरातील अनंताची फुले दिली जात असत. त्याचप्रमाणे वाडय़ात पूर्वीच्या काळी गुरे असल्याने वसुबारसाचाही कार्यक्रम केला जात असे. यासाठी गावातील मंडळी मराठे वाडय़ात वसुबारसाच्या पूजेसाठी येत असत. वाडय़ात आजही ‘तुळशीचे लग्न’ न चुकता पार पडते. मराठे वाडय़ात मुंगूस, साप, धामण आजही आढळतात; परंतु त्यांच्यापासून इजा कधीही कुटुंबीयांना झाली नसल्याचे मराठे कुटुंबीय आवर्जून सांगतात.
पूर्वीच्या काळी मराठे वाडय़ात एकसंध असे अंगण होते. काळानुरूप वाडय़ात बदल झाले; परंतु वाडय़ातील अंगण हे आजही तसेच आहे. विशेष म्हणजे वाडय़ातील हे अंगण आजही शेणाने सारवलेले पाहावयास मिळते. मराठे वाडय़ातील अंगण, झाडेझुडपे साक्षात कोक णात आल्याचाच आनंद देतात. वाडय़ाच्या एका भागात विहीर पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी या विहिरीवर गावातील लोक पाणी भरण्यासाठी येत असत. वाडय़ातील या विहिरीवर पूर्वीच्या काळी समाजातील विविध स्तरांतील लोक पाणी भरायला येत असत. जात, धर्म या सगळ्याला छेद देईल याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळत होता; परंतु काही वर्षांपूर्वी कल्याणातील काळा-तलावाचे पाणी उपसण्यात आले. काळा तलावाचे पाणी जुन्या कल्याणातील पारनाका परिसरातील पोखरण तलावास लागत होते, तर पोखरण तलावाचे पाणी गावातील विहिरींना होते, असे मराठे कुटुंबीय सांगतात; परंतु काळा-तलावाचे पाणी उपसल्यानंतर पोखरण तलावाचेही पाणी आटले आणि परिणामी गावातील विहिरींचेही पाणी आटून गेले. १९७९ मध्ये मराठे वाडय़ात ३५ कुटुंबीय वास्तव्यास होते. मराठे वाडय़ात १९७०-७१ पर्यंत भाडेकरूही राहत असत. यामध्ये शिधीड, कुळकर्णी, पाटील, इनामदार, भदे, चिपळूणकर, प्रसादे, दांडेकर, घाडे आदी कुटुंबांचा समावेश होता. आजमितीला या वाडय़ात केवळ ५ मराठे कुटुंबीयांचे वास्तव्य आहे.
कै. परशुराम मराठे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते. त्यांचे सुपुत्र कै. नारायणराव मराठे यांनी १९६७ मध्ये कल्याणचे नगराध्यक्ष पद भूषविले. कै. नारायणराव मराठे हे सिडकोचेही अध्यक्षही होते. विशेष म्हणजे या काळातही त्यांचे वास्तव्य आपल्या वाडय़ातच होते. कै. नारायणराव मराठे यांचा भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात मोठा वाटा होता. कै. नारायणराव मराठे यांचे बंधू भास्करराव मराठे रा.स्व. संघाचे प्रचारक होते. छत्रपती शिक्षण मंडळाच्या उभारणीतही त्यांचे योगदान होते. कै. गणेश मराठे (नाना मराठे) यांच्या स्वर्ग सोपान मंडळातर्फे अंत्यविधीचे सामान अल्पदरात उपलब्ध करून दिले जात असे. साधारण ३० वर्षे हे कार्य अविरतपणे सुरू होते. वाडय़ातच हे सामान ठेवले जात असे. त्यामुळेच की काय, मराठे वाडय़ात दिवस-रात्र लोकांची वर्दळ असे. आज मात्र उंचच उंच इमारतींच्या गर्तेत वाडा इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा