दीड महिन्यांत २३ श्वानांना बाधा, दहा श्वानांचा मृत्यू
दिवसेंदिवस तापमानाचा पारा वर चढू लागल्याने एकीकडे नागरिकांचे हाल होत असतानाच वाढत्या उष्म्याचा फटका पाळीव प्राण्यांनाही बसू लागला आहे. गेल्या दीड महिन्यात डोंबिवलीत उष्माघातामुळे २३ श्वानांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. यापैकी १३ श्वानांना गेल्या आठवडय़ापासून वाढलेल्या उकाडय़ाचा फटका बसला. आतापर्यंत दहा श्वानांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
श्वानांच्या शरीराचे तापमान मुळातच ९९ ते १०९ अंशापर्यंत असते. शरीरातील तापमान जास्त असल्याने वाढलेल्या उन्हाचा त्रास प्राण्यांना अधिक भेडसावतो. डोंबिवली शहरातील एमआयडीसी, रेतीबंदर, पांडुरंगवाडी या ठिकाणी उष्माघाताचे बळी ठरलेल्या श्वानांची मोठय़ा प्रमाणात नोंद पशुवैद्यांकडे झाली आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, उलटय़ा होणे, ओठ पांढरे होणे, जीभ लाल होणे, शरीरातील पाण्याची कमतरता, तोंडातून घट्ट लाळ बाहेर पडणे, हृदयाचे ठोके वाढणे, फीट किंवा चक्कर येणे यांसारखी लक्षणे श्वानांमध्ये आढळून येत आहेत, अशी माहिती वेटरनरी प्रॅक्टिशनर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर अकोले यांनी दिली.
काय काळजी घ्याल?
- श्वानांना हवेशीर वातावरणात ठेवा.
- दिवसातून दोनदा श्वानांचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्या.
- उन्हाळ्याच्या दिवसात श्वानांचे केस कापणे गरजेचे आहे.
- श्वानांना भरपूर प्रमाणात पाणी पिण्यास देणे आवश्यक आहे.