कल्याण – कल्याण पूर्व भागात काही संस्थांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि समर्थक राहुल पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधाचे फलक लावले आहेत. यामधील काही फलक हेतुपुरस्सर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कल्याण पूर्वेतील तिसगाव येथील घराच्या समोर लावण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या फलकांवरून यापुढे शिवसेना नेते, पदाधिकारी बाद? भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा निर्णय
या फलकाच्या माध्यमातून शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आमदार गायकवाड यांचा नामोल्लेख टाळून निषेध करण्यात आला आहे. यामधील काही फलक नंदादीप रहिवासी संघाकडून लावण्यात आले आहेत. हे फलक तेढ निर्माण करणारे असुनही कल्याण डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा कोळसेवाडी पोलिसांनी हे फलक काढलेले नाहीत. संस्थांनी लावलेल्या फलकांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. या फलकांना आव्हान देण्याचा विचार भाजपकडून केला जात आहे. याविषयी स्थानिक पदाधिकारी मात्र कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला देत असल्याचे समजते. बेकायदा फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होते हे माहिती असुनही पालिका अधिकारी या फलकांवर कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.