आकांशा मोहिते, लोकसत्ता
ठाणे : दोन वर्षांपासून असलेले करोनाचे संकट कमी झाल्यामुळे यंदा होळी, धुळवडीच्या सणाच्या निमित्ताने बाजाराला नवा रंग चढला आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा हे दोन्ही दिवस जल्लोषात साजरे करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून त्यांच्या दिमतीला बाजारपेठही सजली आहे. वेगवेगळय़ा आकारांतील आकर्षक पिचकाऱ्या, रंगांचे प्रकार, रंगीबेरंगी कपडे यांची बाजारात रेलचेल असून त्यांच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.
मुंबई, ठाणे आणि आसपासच्या बाजारपेठेत होळी आणि रंगपंचमीनिमित्त पंधरा दिवस आधीपासूनच बाजारपेठा सजलेल्या असतात. मागील दोन वर्षांपासून करोना निर्बंधामुळे होळी सणावर साथीचे सावट होते. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. त्यामुळे हा सण साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी रंगपंचमीनिमित्त चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध होत असतात. या पिचकाऱ्या स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहकांचीदेखील मोठी मागणी असते. यंदा विक्रीसाठी बहुतांश पिचकाऱ्या देशी बनावटीच्या आहेत. यामध्ये स्पायडरमॅन, मोटू पतलू, डॉरेमन, कॅप्टन अमेरिका, फ्रोझन, अल्क, तर खास मुलींसाठी गुलाबी रंगाच्या बारबी डॉल अशा विविध कार्टूनच्या आकाराचे तसेच मंकी, रॅबिट या प्राण्यांच्या आकाराच्या आणि टरबूज, किलगड, संत्रे या फळांच्या चित्ररूपात विविध आकर्षक पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. या सर्व पिचकाऱ्यांचे दर ३०० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत आहेत. यंदा सर्व पिचकाऱ्यांमध्ये विशेष लक्ष वेधून घेणारी मीडिया बूम आकाराची पिचकारी बाजारात पाहायला मिळत असून ५० ते ६० रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. याबरोबरच पूर्वीपासून विकल्या जाणाऱ्या पंप, टॅंक आकाराच्या पिचकाऱ्या ३० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असून यंदा पिचकाऱ्यांच्या दरात वाढ झाली नसल्याचे ठाण्यातील विक्रेते रमेश राठोड यांनी सांगितले.
मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरांत होळीच्या विविध रंगांची आवक प्रामुख्याने पुण्याहून करण्यात येते. यंदा बाजारपेठेत रंगांची आवक कमी असल्यामुळे प्रतिकिलो रंगामध्ये २० ते ३० रुपयांनी महाग झाले आहेत. सद्य:स्थितीला रंग १५० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. मात्र, नागरिकांकडून नैसर्गिक रंगांना जास्त पसंती आहे, असे ठाण्यातील रंगविक्रेते गणेश गुप्ता यांनी सांगितले. बाजारात खास धुळवडीच्या दिवशी परिधान करण्यासाठी आकर्षक टीशर्ट, कुर्ते, मुलींचे टॉपही उपलब्ध झाले आहेत.
मिठाई, थंडाईची रेलचेल
होळीनिमित्त थंडाईला प्रामुख्याने विशेष मागणी असते. यंदा बाजारात ड्रायफ्रूट केशर मिठाई, आमरस अशा थंडाई बाजारात उपलब्ध आहेत. तसेच होळीनिमित्त खास घेवर मलाई, गुजिया यांची मागणी मोठी असते. घेवर मलाई २२० रुपयांनी तर गुजिया हा पदार्थ ८०० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे, असे मिठाई विक्रेते देवाशीष दास यांनी सांगितले.