हॉटेल, रिसॉर्टमध्ये धुळवडीचा खेळ; पर्यटनस्थळांवर मुक्काम सहली; ‘ट्रेकिंग’मध्ये सवलती
गीता कुळकर्णी, लोकसत्ता
ठाणे : इमारती, चाळींच्या आवारात संगीताच्या तालावर होळी आनंद साजरा करण्याचा ‘ट्रेंड’ आता बदलत चालला असून हॉटेल, रिसॉर्टमधील पाटर्य़ामध्ये हजेरी लावून धुळवड साजरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील अनेक हॉटेल, रिसॉर्टमध्ये खास धुळवडीच्या पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले असून यातील बहुतांश ठिकाणे आताच ‘फुल्ल’ झाली आहेत. एवढेच नव्हे तर, पर्यटनस्थळांवर मुक्काम सहली (कॅम्पिंग) आणि गिर्यारोहण करून सण साजरा करण्याचे बेतही आखले जात आहेत.
गेल्या काही वर्षांपासून धुळवडीच्या निमित्ताने मिळणारी सुट्टी साजरी करण्यासाठी शांत पर्यटनस्थळी जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. रंगपंचमी साजरी करण्याचा हा बदलता दृष्टिकोन लक्षात घेऊन हॉटेल तसेच रिझॉर्टचालकांनी व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न सुरूकेले आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या ठिकाणी यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असे कार्यक्रम आखले जात असून रंगपंचमीला थर्टी फर्स्ट पाटर्य़ाचा साज चढविला जात आहे. ठाणे शहरातील अनेक हॉटेलांमध्ये यंदा संगीत, डीजे आणि विविध रंगांनी होळी खेळण्यासाठी सवलतींचा वर्षांव करण्यात आला आहे. या वेळी नियॉन या आधुनिक आणि नैसर्गिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या रंग प्रकाराचे होळी खेळण्यास विशेष आकर्षण ठरत आहे. यासाठी ग्राहकांना किमान पाचशे ते कमाल १५०० रुपयांपर्यंतच्या नोंदणीचे पर्याय उपलब्ध आहेत. अनेक रिसॉर्टमध्ये प्रत्यक्ष संगीत तसेच डीजेसह कृत्रिम पावसाखाली नृत्य, विविध रंगांनी भरलेले हौद, कराओके संगीत, प्रत्यक्ष बँड सादरीकरण अशा प्रकारे ग्राहकांच्या करमणुकीची सोय करण्यात आली असल्याचे आढळून येत आहे. समुद्रकिनाऱ्याचा देखावा, साहसी खेळ अशा विविध संकल्पना या वेळी ठाण्यातील रिसॉर्ट घेऊन येत आहेत. या सर्व संकल्पनेत त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांच्या वापराची दखल घेण्यात आली असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक गडकिल्ले, शिखर अशा गिर्यारोहणाच्या ठिकाणी तसेच समुद्रकिनारा आणि आवडत्या आकर्षक ठिकाणी होळी खेळण्यास विविध प्रकारे कॅम्पिंगचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
थंडाईचे आकर्षण
हॉटेल, पब आणि रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या होळी या सणाच्या संकल्पनेत थंडाई या संस्कृती जपणाऱ्या संकल्पनेची भर पडली आहे. होळी साजरा करण्यासोबतच थंडाई पिण्याचे आकर्षण ग्राहकांना वाटत असल्याचे या वेळी आढळून येत आहे. ३१ डिसेंबरच्या दिवशी केल्या जाणाऱ्या मद्यपानाशिवाय थंडाई पिऊन आनंदात होळी साजरा करण्याकडे सध्या ग्राहकांचा कल दिसत आहे.