ठाणे : होळी सणाच्या काळात पाण्याने किंवा रंगाने भरलेल्या प्लास्टिक पिशव्या अंगावर फेकण्याच्या प्रकारांना आळा बसावा तसेच पर्यावरणपुरक होळी साजरी व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये शहरातील एक हजाराहून अधिक दुकानांची तपासणी करत पालिका प्रशासनाने ७८ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे एकल वापराच्या प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
होळी सणाच्या काळात पाण्याने किंवा रंगाने भरलेल्या प्लास्टिक पिशव्या अंगावर फेकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. यासाठी एकल प्लास्टिकचा मोठ्याप्रमाणात वापर होतो. दूर अंतरावरून फेकल्या जाणाऱ्या या पिशव्यांमुळे जोराचा मार लागत असून त्याचबरोबर काही नागरिकांना दुखापत झाल्याचे प्रकार यापुर्वी समोर आले आहेत. त्यामुळे पाण्याने किंवा रंगाने भरलेल्या प्लास्टिक पिशव्या अंगावर फेकण्याच्या प्रकारांना आळा बसावा तसेच पर्यावरणपुरक होळी साजरी व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये एकल वापराच्या प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे. या कारवाईत नौपाडा, वागळे इस्टेट आणि माजिवडा-मानपाडा या तीन प्रभाग समिती क्षेत्रात १००२ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात ७८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेने दिली.
ठाणे महापालिकेकडून एकल प्लास्टिक जप्तीची कारवाई वर्षभर सुरू आहे. यामध्ये १ एप्रिल, २०२४ ते ६ मार्च, २०२५ या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी एकल वापराच्या प्लास्टिकच्या बंदीबाबत मोहीम हाती घेतली. त्यात, एकूण ४१८० आस्थापनांना भेट दिल्या. त्यातून २१३९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर, दंडापोटी १३ लाख ५६ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आला.
पर्यावरणपूरक होळी साजरी करताना एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समिती निहाय कारवाई सुरू केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्या समन्वयाने ही कारवाई सुरू असून इतर प्रभाग समिती क्षेत्रातही कारवाई केली जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.