ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरा केली. यावेळी त्यांनी नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत सणाचा आनंद द्विगुणित केला. शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, शिंदे यांची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबतही मिठाई वाटून धुळवड साजरी केली. त्यानंतर त्यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रम परिसरातही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत उत्सव साजरा केला.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली
नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यात धुळवडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील अनेक गृहसंंकुलांमध्ये, मैदानात धुळवडीनिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली. त्यांच्या निवासस्थानी त्यांचे कार्यकर्ते, पत्रकार, सुरक्षा पाहणारे पोलीस उपस्थित होते. त्यांच्यासोबतही शिंदे यांनी उत्सव साजरा केला.
हेही वाचा >>> डोंबिवलीत आयरे गाव हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामांना नोटिसा, बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश
राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागले. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलिवंदन सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमाला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना अभिवादन करून त्यांच्या तसबीरीवर रंग उधळून धुळवडीचा सण साजरा केला. त्यानंतर आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.