ठाणे : करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे होळी आणि धुळवडीचा सण साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा करोनाचा संसर्ग ओसरल्याने या वर्षी नागरिकांनी होळी आणि धुळवडीचा मनसोक्त आनंद घेतल्याचे चित्र होते. ठाणे, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांतील गृहसंकुल तसेच चाळीमध्ये आणि परिसरातील चौकात शुक्रवारी नागरिकांनी धुळवड साजरी केली. तर, कल्याण वगळता इतर शहरातील रस्त्यांवर यंदाही शुकशुकाट दिसून आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांपासून  करोना प्रादुर्भाव ओसरला असल्यामुळे निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे होळी आणि धुळवड साजरी करताना नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता.

ठाणे शहरातील चेंदणी कोळीवाडा या भागात दरवर्षी होळीच्या आदल्या दिवशी चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणेतर्फे ‘एक गाव एक होळीचे’ आयोजन करण्यात येते. करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे या ठिकाणी उत्साहात होळी साजरी करता आली नव्हती; परंतु यंदाच्या वर्षी सर्व आगरी कोळी बांधवांनी एकत्र येऊन मोठय़ा उत्साहाने होळी साजरी केली, तर  होळीच्या दिवशीही शहरातील विविध भागांत मोठय़ा प्रमाणात होळीदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळवडीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही नागरिकांनी मनसोक्त आनंद घेत धुळवड साजरी केली. गृहसंकुल तसेच चाळीतील रहिवाशी एकत्र येऊन रंग खेळत होते, तर उपवन तसेच मासुंदा तलावाजवळ काही तरुणांनी काही प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. असे असले तरी दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी गजबजणाऱ्या शहरातील रस्त्यांवर यंदाही शुकशुकाट पाहायला मिळाला, तर  अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरांतही होळीदहनाचा उत्साह दिसून आला. शुक्रवारीही धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळाली. दुपारनंतर बदलापूर, कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनारी अनेकांनी गर्दी केली होती. धुळवड साजरी करण्यासाठी शहरातून ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने पर्यटकांनी धाव घेतली होती.

कल्याण-डोंबिवलीत वाद्यवृंदात धुळवड

कल्याण, डोंबिवली शहरांत गुरुवारी रात्रीपासून होळीचा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरातील मुख्य रस्ते, चौक, गल्लीबोळात शुक्रवारी सकाळपासून तरुणांचे जथे रस्त्यांवर धुळवड खेळत होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कल्याण, डोंबिवलीतील मुख्य रस्ते, चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन वर्षांनंतर प्रथमच मोकळय़ा वातावरणात होळी उत्सव साजरा करण्यास मिळाल्यामुळे रस्त्यावर, गृहसंकुलाच्या आवारात पुरुष, महिला, लहान मुले, तरुण रंगाने न्हाऊन गेले होते. अनेक ठिकाणी ज्येष्ठ, वृद्ध या रंगोत्सवात सहभागी झाले होते. काही भागांत वाद्यवृंद, नाचगाणी सुरू होती. वाहनचालकांना वाहने अडवून रंग लावण्याचे प्रकार सुरू होते. २७ गावांमध्ये गावाच्या प्रवेशद्वारावर रंगोत्सव साजरा करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले आहेत.

राजकीय होळी

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथे शिवसैनिकांसोबत, तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाचपाखाडी येथील कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत नैसर्गिक रंगांनी धुळवड साजरी केली.

कार्यक्रमांचे आयोजन नाही

दर वर्षी शहरातील रस्त्यांवर आणि मैदानांमध्ये धुळवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन राजकीय पक्षांकडून करण्यात येते. या ठिकाणी डीजेच्या तालावर थिरकत अनेक जण धुळवड साजरी करतात. करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे या कार्यक्रमात खंड पडला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे हे कार्यक्रम साजरे होण्याची शक्यता होती; परंतु यंदाही कार्यक्रम साजरे झाले नाही.