ठाणे : होळी आणि धुलिवंदन उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ठाणे पोलिसांकडून हा उत्सव शांततेत साजरा केला जावा यासाठी आता बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. विनाकारण अनेकजण पादचाऱ्यांवर, महिलांवर रंगांची उधळण करत असतात. संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास रंग उधळणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच वाहतुक पोलिसांकडूनही होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी मुख्य मार्ग, महामार्ग आणि चौकांत मद्यपी वाहन चालकांना आवर घालण्यासाठी तपासणी केली जाणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी हे भाग येतात. येत्या गुरुवारी होळी आणि शुक्रवारी धुलिवंदन साजरी केली जाणार आहे. ठाणे शहरात गृहसंकुलांमध्ये मोठ्याप्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, अनेक तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकणी देखील धुलिवंदन साजरे करतात. उत्सव साजरे करताना छेडछाट, विनयभंग असे प्रकार होऊ नये यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस आणि काही विशेष पोलीस पथकांचा फौजफाटा शहराच्या विविध ठिकाणी गस्तीच्या ठिकाणी हजर असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन महत्वाच्या, गर्दीच्या ठिकाणी व रहदारीच्या रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे.
धुलिवंदनाच्या दिवशी अनेकदा काहीजण कामानिमित्ताने बाहेर पडत असतात. परंतु त्या व्यक्तींवरही रंगांनी भरलेले फुगे किंवा पिचकाऱ्यांंनी रंग उधळले जातात. त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. महिलांच्या बाबतीत हे प्रकार अधिक होत असतात. त्यामुळे विनाकारण किंवा समोरील व्यक्तीची इच्छा नसतानाही त्याच्यावर रंगांची उधळण केल्यास त्या व्यक्तीची तक्रार आल्यास रंग उधळणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच अनेक गृहसंकलांच्या गच्चीवरून लहान मुले रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तींवर रंगाने भरलेले फुगे फोडत असतात. त्यामुळे गृहसंकुलातील पदाधिकाऱ्यांनी लहान मुलांना गच्चीवर जाण्यास मज्जाव करावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी काही वाहन चालक मद्य पिऊन वाहने चालवित असतात. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांची पथके देखील ठिकठिकाणी तैनात असणार आहेत.
नागरिकांनी होळी आणि धुलिवंदन सण आनंदाने आणि शांततेत साजरा करावा. विनाकारण इतरांना त्रास होऊल अशापद्धतीचे वर्तन आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. – ज्ञानेश्वर चव्हाण, सह आयुक्त, ठाणे पोलीस.