होली मॅगी चर्च, गोराई

गोराई म्हटले की स्वच्छ समुद्रकिनारा, एस्सेल वर्ल्ड अथवा भव्य पॅगोडा यांचीच चर्चा अधिक होते. मात्र याच गोराईने २०० वर्षांपूर्वीचा अनमोल असा ऐतिहासिक ठेवाही जपला आहे, तो म्हणजे होली मॅगी चर्च. या चर्चची दोनशे वर्षांनंतरही भक्कम असलेली वास्तू भाविकांना आकर्षित करत आहे.

गोराईमध्ये जवळपास १०० टक्के मराठी भाषक असलेले ईस्ट इंडियन रोमन कॅथलिक राहतात. निसर्गरम्य अशा वातावरणात पर्यटकांचा प्रचंड राबता असतानाही गोराईने आपले गावपण टिकवून ठेवले आहे. मुंबहून बोरिवली येथून फेरीबोटीने गोराईला जावे लागते. मात्र थेट रस्ता मीरा-भाईंदरवरूनच आहे. सुमारे साडेपाच हजारांच्या आसपास असलेल्या गोराईमध्ये होली मॅगी चर्चची देखणी वास्तू अगदी गावाच्या मधोमधच आहे. हे चर्च फ्रेंच मिशनऱ्यांनी १८१० मध्ये बांधले असले तरी त्याही आधीपासून या चर्चचा इतिहास आहे. गोराई गावातल्या वैराळा तलावाच्या काठी तेव्हाच्या गोराई, मनोरी आणि उत्तनमधल्या ख्रिस्ती धर्मीयांसाठी फ्रेंच मिशनऱ्यांनी १५९५ ते १६०२ या दरम्यान चर्च बांधले होते. त्या वेळी या तीनही गावात मिळून ७२० मोठी माणसे आणि १२० छोटी मुले एवढीच वस्ती होती; परंतु पुढे झालेल्या लढायांमध्ये चर्चच्या वास्तूची नासधूस झाली. आजही गर्द झाडीत झाकले गेलेले चर्चचे अवशेष पाहायला मिळतात. त्यानंतर मग मिशनऱ्यांनी १८१० मध्ये गोराई गावात होली मॅगी चर्चची स्थापना केली. आज केवळ या चर्चच्या धर्मग्रामात सुमारे एक हजार कुटुंबे राहतात.

भगवान येशूच्या जन्माच्या वेळी आशिया खंडातून तीन राजांनी ख्रिस्ताचे दर्शन घेण्यासाठी बेथलहेम येथे भेट दिली होती, अशी आख्यायिका आहे. या तीन राजांच्या नावानेच हे चर्च होली मॅगी चर्च म्हणून आळखले जाते. संपूर्ण भारतात या तीन राजांच्या नावे असलेले हे एकमेव चर्च आहे. या चर्चमध्ये असलेल्या वेदीलाही ऐतिहासिक वारसा आहे. १६ व्या शतकात नरवीर चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसईचा किल्ला जिंकला. त्या वेळी किल्ल्यातल्या चर्चमध्ये असणारी वेदी गोराई चर्चमध्ये आणण्यात आली. दोनशे वर्षे पूर्ण केल्यानंतरही या चर्चची इमारत अतिशय भक्कम आहे. किरकोळ डागडुजी वगळता चर्चच्या मुख्य दगडी इमारतीला देखभालीची गरज आजपर्यंत लागलेली नाही. २०१० मध्ये चर्चचा द्विशताब्दी सोहळा साजरा केला गेला. वर्षभर यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले गेले होते. जानेवारी २०११ मध्ये पार पडलेल्या या सोहळ्याच्या सांगता समारंभाला बिशप बास्को पेन्हा उपस्थित राहिले होते. पारंपरिक लुगडी नेसलेल्या आणि दागिने परिधान केलेल्या महिला, तसेच पारंपरिक वेषातील पुरुष यामुळे या सांगता सोहळ्याला आगळेवेगळे रूप प्राप्त झाले होते. पर्यावरण आणि होली मॅगी चर्च या विषयावर आधारित युवकांनी स्वत:च रचलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या ईस्ट इंडियन गाण्यांची स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम या सांगता सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले होते.

सामाजिक बांधिलकी

भक्तीसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम हे चर्च करत आहे. सध्या मायकेल डिकोस्टा आणि संदीप बोर्जीस हे दोन धर्मगुरू या चर्चमध्ये आहेत. चर्चच्या आवारातच बालवाडी ते दहावीपर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेची नुकतीच पुनर्बाधणी पूर्ण करण्यात आली आहे. सूर्योदय या चर्चशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. गोराईमधील बहुतांश रहिवासी कोळी समाजाचे. मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय. या सर्वामध्ये जनजागृती करण्याचे काम ही संस्था करत असते. आपले आरोग्य कसे राखावे, बचत कशी करावी, शिक्षण आणि त्याचे महत्त्व आदी विषयांवर बाहेरून तज्ज्ञ वक्ते बोलावून त्यांचे मार्गदर्शन देणे, स्वच्छतेबाबत जागरूकता आणणे असे विविध उपक्रम संस्था राबवत असते. याव्यतिरिक्त चर्चतर्फे अनेकांना वैद्यकीय उपचारासाठी वेळोवेळी मदत केली जाते. गेल्या चार महिन्यांत सुमारे एक लाख रुपयांची आर्थिक मदत चर्चकडून देण्यात आली आहे. शिवाय आर्थिक क्षमता नसणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठीचे शुल्क, उच्च अथवा परदेशी शिक्षणासाठीचा खर्चदेखील चर्चकडून केला जातो.