कल्याण – कल्याण, डोंबिवलीत दोन वेगळ्या प्रकरणांमध्ये घर खरेदीदारांची एकूण पाच कोटी ७९ लाखाची फसवणूक विकासकांनी केली आहे. या फसवणूक प्रकरणी रामनगर, बाजारपेठ पोलीस ठाण्यात घर खरेदीदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पश्चिमेत एका विकासकाने घर खरेदीदारांची पाच कोटी ६६ लाखाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने विकासक आणि त्यांच्या सहकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बारा वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत एका विकासकाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या घेऊन एक इमारत उभारली. एका नोकरदार महिलेला घराची गरज होती. या महिलेने विकासकाच्या कार्यालयीन सहकाऱ्याशी संपर्क करून सुरू असलेल्या बांधकामात घर घेण्याची इच्छा व्यक्ति केली. विकासकाने एक सदनिका ३६ लाख ४५ हजारांना खरेदी करता येईल, असे खरेदीदार महिलेला सांंगितले. त्याप्रमाणे महिलेने रोख आणि धनादेश स्वरुपात सदनिकेची किंमत विकासाकडे भरणा केली.

हेही वाचा >>>कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे

महिला राहत असलेल्या इमारतीला क प्रभाग कार्यालयाने संबंधित इमारत अनधिकृत असल्याची नोटीस काढली. ही नोटीस पाहून धक्का बसलेल्या महिलेने माहिती अधिकारात पालिकेतून या इमारतीची माहिती मिळवली. त्यावेळी संबंधित महिलेला विकण्यात आलेल्या सदनिकेची जागा संक्रमण शिबीरासाठी (रेफ्युज एरिया) राखीव असल्याचे समजले. या इमारतीच्या जागेवर पालिकेच्या मंजूर नकाशाप्रमाणे २६ सदनिका, सहा व्यापारी गाळे बांधणे बंधनकारक असताना, तेथे ४६ सदनिका, पाच दुकाने गाळे बांधले असल्याचे तक्रारदार महिलेच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याने घर खरेदीदार महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात विकासकाविरुध्द अर्ज केला. विकासकाने महिलेला अर्ज मागे घे नाहीतर तुझी नोकरी घालून टाकेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आपल्या प्रमाणे इतर रहिवाशांची या घर खरेदीत फसवणूक झाली आहे, असे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया

डोंबिवलीत फसवणूक

डोंबिवलीत पाथर्ली भागात घर खरेदी करणाऱ्या एका व्यावसायिकाची १३ लाखाची फसवणूक दोन विकासकांनी  केली आहे. पाथर्ली भागात या विकासकांचे इमारत उभारणीचे काम सुरू होते. या विकासकांनी घर खरेदीदार व्यावसायिकाला २५ लाख रूपयांमध्ये इमारतीमधील चार सदनिका देण्याचे आश्वासन दिले. या बोलण्यावर विश्वास ठेऊन घर खरेदीदाराने १३ लाख रूपये विकासकांच्या खात्यावर जमा केले. घर खरेदीदाराने विकासकांना घर खरेदीचा दस्त नोंदणीकृत विक्री करार होणे आवश्यक असल्याने विकासकांना संपर्क करणे सुरू केले. वारंवार संपर्क करून विकासक खरेदीदाराला कार्यालयात भेटत नव्हते. खरेदीदाराच्या संपर्काला प्रतिसाद देत नव्हते. २५ लाखात चार सदनिका देण्याचे आश्वासन देऊन विकासकांनी आपली १३ लाखाची फसवूणक केली म्हणून घर खरेदीदाराने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home buyers cheated in kalyan dombivli amy