वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट घरपोच दंडाची पावती पाठवण्याची ठाणे शहर वाहतूक पोलिसांची योजना महापालिकेच्या वेळकाढू धोरणामुळे बारगळण्याची चिन्हे आहेत. ही योजना राबवण्यासाठी शहरातील प्रमुख नाक्यांवर सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी महापालिकेस सादर केला होता. मात्र, यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तीन कोटी रुपयांची तरतूद करूनदेखील सीसीटीव्ही बसवण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या नाहीत. 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविण्याच्या संख्येत वाढ होत असून भरधाव वाहन चालवणे, सिग्नल मोडणे, हेल्मेटविना दुचाकी चालवणे अशा प्रकारांमुळे अपघातांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवून वाहतूक नियंत्रण शाखेत बस्विण्यात येणाऱ्या ‘व्हिडीओ वॉल’च्या साह्याने बेशिस्त वाहनचालक टिपून त्यांना घरपोच दंडाची पावती पाठवण्याची योजना वाहतूक पोलिसांनी आखली आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागांत सुमारे ४० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेला तीन महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र, वाहतूक शाखेच्या प्रस्तावावर अद्याप महापालिकेने निर्णय घेतलेला नाही.
या संदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रस्तावाकरिता महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकर प्रयत्न केले पाहीजेत, असे त्या म्हणाल्या.

अर्थसंकल्पात तरतूद, पण प्रस्ताव नाही..
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘स्मार्ट सिटी सर्विलन्स’ योजनेअंतर्गत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, या प्रस्तावासंबंधी महापालिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने त्यांची आशा फोल ठरली आहे.

Story img Loader