आतापर्यंत गृहवाटिकेचे अनेक पैलू आपण समजावून घेतले. गृहवाटिका आपल्यासाठी कलाकृती होऊ शकते, विरंगुळा होऊ शकतो. स्वयंपाक, देवपूजा, औषध, सजावट अशा विविध कारणांसाठी गृहवाटिकेचा उपयोग होऊ शकतो. आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण सर्वानीच गृहवाटिकेचा लाभ घेणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षण आणि नागरी स्वच्छता यादृष्टीने गृहवाटिका मोलाची भूमिका बजावतात. कारण गृहवाटिका असेल तर घरातला ओला कचरा बाहेर जातच नाही. थोडक्यात गृहवाटिका अनेक अंगांनी उपयुक्त, मोलाची आहेच, पण त्याचबरोबर त्यापासून मिळणाऱ्या आनंदाचे कोणत्याही प्रकारे मोजमाप करता येणार नाही. आदर्श गृहवाटिकेत काय काय असावे? खाली दिलेल्या गोष्टी नक्की असाव्यात. जागेनुसार प्रत्येक प्रजातीतील झाडांची संख्या ठरवावी.
तुळस- कुंडीत किंवा डब्यात न लावता तुळस वृंदावनात असावी. त्यामुळे अधिक प्रसन्न वाटते. फुलझाड- उपलब्ध सूर्यप्रकाशाप्रमाणे फुलझाडांची निवड करावी. शोभेचे झाड- शोभादायक पानांचे झाड, त्यासाठी कमी सूर्यप्रकाश लागतो.
स्वयंपाकासाठी उपयुक्त- पुदिना, अळू औषधी वनस्पती- गवती चहा, ब्राह्मी, रुईलटकती कुंडी- जागा न व्यापता सुंदर दिसतात. त्यात उभे वाढणाऱ्या झाडापेक्षा लोंबकळणारी किंवा पसरणारी झाडे लावावीत. उदा. मनी प्लांट, नागवेल म्हणजे विडय़ाचे पान, ऑफिस टाईम म्हणजेच पोर्चुलाका.
पाण्यात वाढणारे- वॉटर रोझ (याच्या पानांची रचना गुलाबाच्या फुलासारखी असते.) किंवा अॅरोहेड (लांब खोड असलेल्या या झाडाला नाजूक पांढरी फुले येतात.)
गृहवाटिकेत पाण्यात वाढणारे झाड नक्की असावे. मात्र त्या पाण्यात गप्पी मासे सोडावेत. गप्पी माशाच्या एका जोडीपासून भरपूर मासे होतात. शिवाय त्यांना वेगळे खाद्य घालण्याची आवश्यकता नसते. मासे नसतील तर पाण्यात डास होतील.
वेली- गोकर्ण, जाई किंवा रानजाई सुगंधी फुलझाड-कामिनी, सोनचाफा, रातराणी वृक्ष झाड- त्यासाठी घरातील व्यक्तींच्या नक्षत्र वृक्षाची अथवा पर्यायी वृक्षाची निवड करावी.
हिरवीगार कुंडी- यात भरगच्च आणि हिरवं दिसणारं झाड अपेक्षित आहे. उदा. छोटी लीली (फुलझाड), किंवा कोलिंजन (औषधी) खतकुंडी- सर्व कुंडय़ांना घालून उरलेल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी शोभेची कुंडी- काही कुंडय़ा अतिशय आकर्षक असतात. त्यामुळे गृहवाटिकेची शोभा वाढते. त्यामुळे अशी किमान एक कुंडीतरी घरच्या बागेत असावी.
उपरोक्त पैलूंबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी गृहवाटिका हे उत्तम माध्यम बनू शकते. लहानपणीच झाडांना जोपासण्याचे संस्कार झाले तर पुढील पिढी पर्यावरणप्रेमी होईल. त्यामुळे शहरातील फ्लॅट संस्कृतीत गृहवाटिका फार महत्त्वाच्या आहेत. गृहवाटिका हे निसर्गप्रेमाचे बीजारोपण आहे. एका छोटय़ा ‘बी’ पासून वाढणारे झाड माणसांना बरेच काही शिकवून जाते.
झाडं आपापसात आणि माणसांशी जोडलेली असतात, हे मी अनुभवाच्या आधारे सांगू शकते. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लांब अंतरावर लावलेली कडुनिंबाची झाडं एकाच दिवशी मेली. शेजारी शेजारी लावलेल्या एकाच प्रकारच्या रोपांपैकी एखादे तुलनेने कमी वाढते.
माझ्या माहेरी खूप छान बाग होती. अर्थातच माझे सर्व झाडांवर खूप प्रेम होतं. माहेरी जाताना मी कळवलेलं नसलं तरी फुललेल्या बागेवरून आईला मी येणार असल्याचे कळत असे. आईच्या निरीक्षणानुसार बागेत जास्त फुलं दिसली की त्या दिवशी मी येणार हे नक्की असायचं. बरेच जण घरी इतर काही नाही तरी तुळस लावण्याचा प्रयत्न करतात. तुळस जगत नाही, अशी तक्रार अनेकजण करतात. त्यांना एक सांगावेसे वाटते. एक कुंडी, एक तुळस असे न लावता दोन कुंडी दोन तुळशीची रोपे असे लावा. तुमचे निरीक्षण मात्र कळवायला विसरू नका..