हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर
निखिल अहिरे
ठाणे : शहरात जागोजागी उभ्या राहणाऱ्या इमारतींमुळे घरासभोवती जागेअभावी झाडांची लागवड करणे शक्य होत नाही. जागेच्या याच समस्येवर तोडगा काढत कल्याणमधील विवेक कदम या २६ वर्षीय तरुणाने घराच्या बाल्कनीत हायड्रोपोनिक्स (पाण्यावरील शेती) पद्धतीचा अवलंब करत विविध पालेभाज्यांची लागवड केली आहे.
कल्याणमधील शक्ती नाका परिसरात विवेक कदम राहतो. विवेकने डोंबिवलीमधील पेंढारकर कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र या विषयातून पदवी मिळवली आहे. त्याने आपल्या घराच्या बाल्कनीतच काही पालेभाज्यांची लागवड करण्याचे ठरविले मात्र जागा अपुरी असल्याने अनेक कुंडय़ा कुठे ठेवायच्या असा पेच निर्माण झाला. त्यातूनच विवेक याने अमेरिका आणि इस्रायल या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात केल्या जाणाऱ्या हायड्रोपोनिक्स शेती पद्धतीचा अभ्यास केला. त्यानंतर विवेकने घराच्या बाल्कनीत हायड्रोपोनिक्स शेतीचा एक छोटा प्रकल्पच उभारला.
सध्या पालक, कोिथबीर, मेथी यांसारख्या पालेभाज्यांची विवेक लागवड करत आहे. त्याच्या या उपक्रमाचे समाजमाध्यमांवर काही छायाचित्र आणि चित्रफितींचा प्रसार झाल्याने अशा पद्धतीने घराच्या आवारात विविध रोपांची लागवड करण्यासाठी अनेक तरुण पर्यावरण प्रेमी विवेककडून या उपक्रमाची माहिती घेत असल्याचे विवेकने सांगितले. या बरोबरच विवेकने दुर्मिळ कीटकभक्षी रोपांची देखील लागवड केली आहे.
काय आहे हायड्रोपोनिक्स शेती?
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणारी शेती ही मातीविना करता येते. मातीविना झाडांना आवश्यक असलेली पोषकतत्वे पाण्याच्या साहाय्याने दिले जातात. वनस्पतींना लागणारी मातीची गरज ही कोकोपीट (नारळाचे चोडे ) च्या मदतीने भागवली जाते. याप्रकारात लागवड करण्याच्या जागेवर फूड ग्रेड पाईप (वाहिनी) ची एक विशिष्ट रचना उभारली जाते. यामध्ये पाण्याच्या प्रवाहाचे नियोजन केले जाते. या वाहिन्यांना ठिकठिकाणी मोठाले छिद्रे करून त्यावर एका वाटीत कोकोपीट टाकून त्यात बियाणांची लागवड केली जाते आणि त्याच्या सहाय्याने पिकांची पूर्ण वाढ केली जाते. सध्या भारतात व्यवसायिक शेती साठी याचा वापर केला जात आहे.
जागेअभावी घराच्या आवारात पालेभाज्यांची लागवड करणे शक्य नसल्याने हायड्रोपोनिक्स पद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे घरीच पौष्टिक आणि रसायनमुक्त पालेभाज्यांची चव चाखता येत आहे. येत्या काही दिवसात विविध फुलांची लागवड करण्याचा मानस आहे.
– विवेक कदम, कल्याण</p>