कल्याण – येथील एक रिक्षा चालक मोहन राठोड यांच्या रिक्षेतून बुधवारी एक महिला प्रवास करत होती. रिक्षेतून उतरल्यानंतर ही महिला जवळील सात तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज असलेली पिशवी रिक्षेत विसरली. चालक राठोड यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी ही पिशवी महात्मा फुले पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिक्षा चालक मोहन राठोड यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या महिलेने रिक्षा चालकाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा >>> सिलिंडर स्फोटात भाजलेल्या कल्याणमधील महिलेचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले, ठाणे येथे राहणाऱ्या नम्रता देशमुख या एक लग्न सोहळ्यासाठी मुरबाड येथे जाणार होत्या. कल्याण बस आगारातून त्या एस. टी.ने प्रवास करणार होत्या. मुरबाडला जाण्यापूर्वी त्या कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणार होत्या.

त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ चिकणघर येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यांच्या जवळ तीन पिशव्या होत्या. एक पिशवी त्यांनी आसनाच्या मागे ठेवली. चिकणघर येथे उतरल्यानंतर नम्रता देशमुख दोन पिशव्या घेऊन भाडे देऊन निघून गेल्या. नातेवाईकांच्या घरी गेल्यावर नम्रता यांना दागिन्यांची पिशवी रिक्षेत विसरली असल्याचे लक्षात आले. त्या तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात आल्या.

हेही वाचा >>> माळशेजमधील काचेचा पूल मार्गी लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय

दरम्यान, रिक्षा चालक मोहन राठोड यांना चिकणघर येथे उतरलेली महिला त्यांची एक पिशवी रिक्षेत विसरली असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या महिलेचा शोध सुरू केला. ती महिला नक्की कोठे गेले याचा शोध घेत असताना पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यांना राठोड यांच्या रिक्षेचा वाहन क्रमांक मिळाला. त्या आधारे पोलिसांनी राठोड यांचा मोबाईल शोधला. पोलिसांनी राठोड यांना संपर्क केला. त्यावेळी एक महिला आपल्या रिक्षेत एक पिशवी विसरली आहे. तिचा आपण शोध घेत आहोत, असे चालकाने पोलिसांना सांगितले. संबंधित महिला पोलीस ठाण्यात आल्या आहेत. याची माहिती राठोड यांना पोलिसांनी दिली. ते तातडीने पोलीस ठाण्यात आले. त्यांंनी पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात पिशवी देऊन त्यांच्या हस्ते देशमुख यांच्या स्वाधीन केली. ही पिशवी आपण रिक्षा संघटनेच्या कार्यालयात ठेवणार होते, असे राठोड यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honest auto driver return 7 tolas of gold to woman passenger who forgot in autorickshaw zws