रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णांकडून जमा होणाऱ्या शुल्कात २८ लाख रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या विश्वास ऊर्फ आप्पा कुलकर्णी या लिपिकावर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रुक्मिणीबाई रुग्णालयात रोखपाल विभागातील विश्वास कुलकर्णी रुग्णांकडून औषध उपचार, रुग्णांना घरी सोडताना जमा होणारे शुल्क जमा करण्याचे काम करीत असे. एखाद्या रुग्णाने २५०० रुपये भरणा केले तर वरच्या पावतीवर २५०० रुपये आणि नक्कल पावतीवर फक्त २५० रुपये टाकले जात असत, अशी कुलकर्णीची अपहार करण्याची पद्धत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून बोलले जाते. अशा पद्धतीने कुलकर्णीने गैरव्यवहार केला आहे.  आजारी असल्याचे नाटक कुलकर्णी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ‘खासगी’ बैठकीला कोणकोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती असायची याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.

पावतीपुस्तके गहाळ
मार्च २०१२पासून कुलकर्णीचा हा प्रकार सुरू होता. लेखा परीक्षण विभागाकडून कुलकर्णी याला वारंवार स्मरणपत्र पाठवून रुग्णालयातील खर्चाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत होती, याबाबत कुलकर्णीकडून टाळाटाळ केली जात होती. रुग्णालयातील पैसे नोंदीची २२० पावतीपुस्तके गहाळ असून, २२ हजार पावत्यांचा हिशेब लागत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.हा गैरव्यवहार दुपटीने वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Story img Loader