ठाणे – ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रस्तावित नवीन जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम जलदगतीने सुरु करण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार आणि बांधकाम विभागाचे सचिव एस.एस. साळुंखे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात आज एक बैठक पार पडली. या बैठकीत रवी चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी निश्चित करून याबाबत अधिक वेगाने काम करण्याचे निर्देश दिले.
ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर नवीन ९०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येणार आहे. यासाठी येथील जुन्या १८ इमारती पाडण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे . या सर्व इमारती १९३६ ते २०१५ या कालावधीत बांधण्यात आलेल्या आहेत. या जागेवर नव्याने रुग्णालय उभे राहणार आहे. या इमारती उभारणीही प्रकिया जलद गतीने सुरु करण्याचे रवींद्र चव्हाण यांनी आदेश आहेत. यासाठी प्रामुख्याने जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर सरंक्षण विभागाऐवजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे यांची नोंद होणे, रुग्णालय बांधकामास पालिकेने तात्काळ मंजुरी देणे, पर्यावरण खात्याची मंजुरी आणणे, अग्निशमन दलाची परवानगी आणणे, इमारतीस अडथळा होणारी झाडे तोडणे अशा विविध कामांचे प्रशासकीय मान्यता मिळविण्यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी सूचना केल्या आहेत. रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर तालुके व ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहुमजली आणि बहुउद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी पुढील दीड वर्षात जिल्हा रुग्णालय सेवेत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस.एस. साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, भूमी अभिलेख उप अधीक्षक योगेश सावकार, महापालिकेचे सहाय्यक नगर नियोजनकार सतीश उईके, अशोक राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणेचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील आदी उपस्थित होते.