ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात ठेकेदारामार्फत ४६ ठिकाणी आपला दवाखाने गेल्या काही वर्षांपासून चालविण्यात येत असल्यामुळे पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेतून ६८ ऐवजी ४८ ठिकाणीच दवाखाने सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेंतून ४८ पैकी ६ ठिकाणीच दवाखाने सुरू करण्यात पालिकेला यश आले आहे तर, उर्वरित दवाखाने सुरू करण्यासाठी पालिकेला जागा उपलब्ध होत नसल्याची बाब पुढे आली आहे.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेतून ६८ दवाखाने सुरू करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेला गेल्यावर्षी दिले होते. या दवाखान्यांच्या उभारणीपासून ते डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. या दवाखान्यांसाठी पालिकेने २२ ठिकाणी जागा निश्चित केल्या होत्या. त्यापैकी सहा ठिकाणी दवाखाने सुरू करण्यात पालिकेला यश आले आहे. यामध्ये वागळे इस्टेटमधील नेहरुनगर, दातिवली, साबेगाव, खिडकाळी, सैनिकनगर, कोपरी जकात नाका, या केंद्राचा समावेश आहे. पालिकेच्या अख्यारित असलेल्या जागांवर हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित ४६ ठिकाणी दवाखाने उभारणीसाठी पालिकेकडून जागेचा शोध सुरू होता. परंतु जागा उपलब्ध होत नसल्यामुळे पालिकेला दवाखान्यांची उभारणी करणे शक्य नसल्याचे चित्र आहे. मध्यंतरी पालिकेने दवाखान्यांसाठी भाड्याने जागा घेण्याकरिता निविदा काढली होती. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे दवाखाने उभारणीत जागेची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
हेही वाचा – टिएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, या उद्देशातून शहराच्या विविध भागात आपला दवाखाना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पालिका ठेकेदारामार्फत संपूर्ण शहरात ४६ ठिकाणी दवाखाने चालविते. यामुळे नागरिकांना घराच्या परिसरातच विनामुल्य प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध होत आहे. शहरात ४६ ठिकाणी आपला दवाखाने सुरू आहेत. त्यामुळे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेतून ६८ ऐवजी ४८ दवाखाने सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामुळे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेतील दवाखान्यांची संख्या २० ने कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच ४८ पैकी ११ दवाखाने सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी ६ दवाखाने सुरू होऊ शकलेले असून उर्वरित ५ ठिकाणी दवाखाने उभारणीची कामे सुरू आहेत. तसेच उर्वरित दवाखान्यांच्या उभारणीसाठी जागा भाड्याने घेण्याकरिता पालिका प्रशासनाकडून पुन्हा निविदा प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.
नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेतील दवाखान्यांसाठी ठाणे महापालिकेला केवळ शहरात जागा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. यासाठी शहरातील २२ ठिकाणी पालिकेने यापूर्वीच जागा निश्चित केल्या आहेत. त्यामध्ये खिडकाळी, दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद, एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, रामनगर, हाजुरी, गांधी नगर, येऊर, बामनोई पाडा, कळवा, मानपाडा, सावरकरनगर, वागळे इस्टेट, ढोकाळी, दिवा या भागातील जागा आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
ठाणे शहरात आपला दवाखाना योजनेतून ४६ ठिकाणी दवाखाने सुरू आहेत. त्यामुळे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र योजनेतून ६८ ऐवजी ४८ ठिकाणीच दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ११ ठिकाणी दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. या दवाखान्यांकरिता जागा भाड्याने घेण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. – उमेश बिरारी, उपायुक्त, ठाणे महापालिका