आशीष धनगर
राज्य सरकारने खासगी आस्थापनांना कार्यालये सुरू करण्यासाठी परवानगी दिली असली तरी वाहतूक साधनांच्या अभावामुळे दिवा, कल्याण डोंबिवलीत नोकरदार महिलांपुढे अडचणींचा डोंगर उभा आहे.
सकाळी दहा वाजताच्या बसमध्ये किमान उभ्याने प्रवास करता यावा यासाठी सकाळी सहा वाजेपासून रांगा लावाव्या लागत आहे. घरातील काम करण्यात महिलावर्ग व्यग्र असल्याने घरातील पुरुष मंडळीच सकाळपासून बसच्या रांगेत उभे राहातात आणि काम उरकून येणाऱ्या महिलांसाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे चित्र येथील बसथांब्यांवर दिसू लागले आहे.
मुंबई ठाण्यातील खासगी कार्यालये सोमवारपासून सुरू झाली असली तरी ठोस वाहतूक व्यवस्थेअभावी नोकरदारांचे हाल होत आहेत. रेल्वेसेवा बंदच असल्याने उपलब्ध बसमध्ये जागा मिळविण्यासाठी हजारो प्रवाशांना विशेषत: महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. डोंबिवली तसेच दिव्यातून सकाळी १० वाजता बेस्टची बस मुंबईच्या दिशेने निघते. ही बस पकडण्यासाठी तीन ते चार तास आधी रांग लावावी लागत आहे. त्यामुळे दिवा, कल्याण आणि डोंबिवलीतील महिला घरातील पुरुषांनाच सकाळी साडेपाच ते सहा वाजल्यापासून बसच्या रांगेत उभे राहाण्याच्या कामगिरीवर पाठवितात. घरातील सर्व कामे आवरून या महिला ८.३० ते ९ वाजेपर्यंत स्वत: रांगेत उभे राहण्यासाठी येतात. ज्या घरातील पुरुषांनाही कामावर जावे लागते. अशा महिलांना तर सकाळपासूनच बसच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.
इतर आजार बळावण्याची भीती
डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांचे हालही वाईट आहेत. मुंबईपर्यंतचा प्रवास चार-साडेचार तासांचा असतो. या कालावधीत कोठेही स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होते. असा प्रवास रोजच सुरू राहिल्यास या महिला इतर आजारांना बळी पडण्याची शक्यता डोंबिवलीच्या प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी व्यक्त केली.