लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली- बुधवारी दुपारी रक्षाबंधनानिमित्त बाहेर पडलेल्या कुटुंबीयांचे घर चोरट्यांनी लुटले. घरातील सात लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागात ही घटना बुधवारी दुपारी घडली.

भोपर रस्ता देसलेपाडा भागात राहत असलेल्या ओमकार भाटकर (२७) यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. रक्षाबंधन असल्याने तक्रारदार ओमकार आणि त्याची आई-वडील हे आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनासाठी गेले होते. दुपारी दीड वाजता घराचा दरवाजा, खिडक्या व्यवस्थित बंद करुन कुटुंबीय घराबाहेर पडले.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकाचा ऑक्टोबरनंतर कायापालट, प्रवाशांसाठी पंचतारांकित सुविधांचे नियोजन

पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी भाटकर कुटुंबीय घर बंद करुन गेलेत याची खात्री पटल्यावर चोरटे ते राहत असलेल्या सोसायटीत आले. दुपारची वेळ असल्याने सोसायटीत सामसूम होती. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडला. घरात प्रवेश करुन कपाटातील लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून तिजोरीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

दुपारी चार वाजता भाटकर कुटुंब घरी आले. तेव्हा त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले तर सर्व सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकून दिले होते. लोखंडी कपाट उघडे होते. चोरी झाल्याचे समजल्यावर कुटुंबीयांना मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House of family who had gone for rakshabandhan in dombivli was robbed mrj