महिलेला बांधून रोख व दागिने लुटले

बदलापूर शहराजवळील इंदगावात भर दुपारी घरात घुसून तीन अज्ञात चोरटय़ांनी घरातील महिलेला बांधून तिला हत्याराचा धाक दाखवत घरफोडी केल्याची घटना १५ डिसेंबरला घडली आहे. घरातील कपाट फोडून त्यातील रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी चोरला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून ही महिला भयभीत झाली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील इंदगाव येथे गेल्या मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास शोभा हरिभाऊ  कडव (४५) या त्यांच्या घरात होत्या. शोभा या दारे खिडक्या बंद करून झोपल्या असताना अंदाजे २० ते २५ वयोगटाचे तीन अज्ञात चोरटे घराचे दार फोडून आत शिरले. त्यातील एकाने शोभा यांना धमकावून त्यांचे हात बांधत व तोंडाला पट्टी लावली आणि त्यांच्यावर पिस्तुल आणि चाकू रोखून धरत दम दिला. त्यातील दोघांनी कपाट फोडून त्यातील गंठण, कानातील दागिने, अंगठय़ा असे दागिने आणि रोख रक्कम एक लाख दहा हजार असे मिळून सुमारे तीन लाख १५ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. शोभा कडव यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक डी. सी. पोरे हे अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader