ठाणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार यादी पुनरिक्षणासाठी जिल्ह्यातील ५ हजार ३२७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत २१ जुलै, २०२३ पासून ते २१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नवमतदार युवा, युवतींनी तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी तातडीने नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुका न्याय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. याच पार्श्वभूमीवर १७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाईल. निवडणूक आयोगाने निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूने मतदार यादी पुनरिक्षण तर दुसरीकडे जिल्हापातळीवर मतदान यंत्र तपासणीचे काम सुरू केले आहे. मतदार यादी पुनरिक्षणासाठी जिल्ह्यातील ५ हजार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत २१ जुलै २०२३ पासून ते दि.२१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. या मध्ये १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२३ रोजी ज्या नागरिकांचे वय वर्षे अठरा पूर्ण असेल त्यांना १७ ऑक्टोंबर, २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या विशेष मोहिमे अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. याच बरोबर मतदारांनी आपले नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. नवमतदार नोंदणीची विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. विशेष करून दिव्यांग, तृतीयपंथी, महिला मतदारांच्या नोंदणीवर भर देण्यात येईल. महाविद्यालयांमध्येही १८ वर्षे पूर्ण झोलेल्या युवक व युवतीचे प्रबोधन करून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

हेही वाचा >>>ठाण्यात चोवीस तासात २१४ मिमी पावसाची नोंद, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस

हेही वाचा >>>ठाणे : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला, तीनजण जखमी

जिल्हा निवडणूक विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने ८० वर्षावरील मतदारांची यादी तयार करणे, मृत मतदारांचा मृत्यु दाखला घेऊन त्यांचे नाव यादीतून वगळणे, स्थलांतरित कुटूंबांकडून फॉर्म भरून घेणे, १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलामुलींचे नवीन मतदार नोंदीसाठी फॉर्म भरून घेणे यांसारखी कामे करण्यात येणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House to house visits will be made by polling center level officers under voter list revision amy