ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास आळीनाशक औषधांची फवारणी करावी, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या संकुलामध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्यास दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे. महापालिकेने याबाबत नोटिसा पाठविल्या असून त्याबाबत नाराजीचा सूर उमटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गल्ल्या, गटारे, संकुले, चाळी, झोपडपट्ट्या येथे डास आळीनाशक औषधांची फवारणी केली जाते. करदात्या ठाणेकरांना पालिका ही सेवा विनामुल्य देते. मात्र आता याचा भार ठाणेकरांवरच पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात काळात अनेक ठिकाणी पाणी साचून त्यात डास आळ्यांची उत्पत्ती होते. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रसार होतो. सदनिकांच्या गॅलरीमधील मोकळ्या जागा, झाडांच्या कुंड्या, अडगळ येथे पावसाचे पाणी साचते. तसेच इमारतींच्या आवारात, गच्चीवर साचविलेले साहित्य, गाड्यांचे टायर, भंगार येथेही डासांची उत्पत्ती होते. आपल्या इमारतीत अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंटचे अध्यक्ष किंवा सचिव यांची असल्याचे पालिकेने नोटिशीमध्ये स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात गृहरक्षकाला न्यायबंद्याची मारहाण

आदेश काय?

– शासनाने अधिकृत केलेली स्वतंत्र पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमावी

– डास आळीनाशक औषधांची फवारणी प्रत्येक आठवड्यास करावी

– तीन आठवड्यांतून एकदा शास्त्रोक्त पद्धतीने धूर फवारणी करावी

– इमारत आणि परिसरात साचलेले पाणी फेकून शुष्क दिवस पाळावा

– या उपाययोजना करण्यासाठी नागरिकांचे उद्बोधन करावे

५०पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी शासन अधिकृत केलेली स्वतंत्र पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास आळीनाशक औषधांची फवारणी करण्यासंबंधीचा कायदा आहे. त्यानुसत्च पालिका प्रशासनाने ठराव करून तसे सुचनापत्र संकुलांना पाठविले आहे.

– उमेश बिरारी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing complexes in thane get responsibility for mosquito control zws