उन्हाची काहिली सुरू झाली की पावले आपोआप वळतात नदी किंवा तलावाकडे! नदीच्या पाण्यात मनसोक्त डुंबायचे आणि उन्हाच्या चटक्यांपासून सुटका करून घेत ‘गारवा’ मिळवायचा याकडे तरुणाईचा कल आहे.. ठाणे किंवा कल्याण-डोंबिवली परिसरात नितळ नद्या मिळणार तरी कुठून? मग तरुणाईची पावले वळतात बदलापूर वा शहापूर-मुरबाड तालुक्यातील दुथडी भरून वाहणारे रम्य नद्यांकडे.. यातीलच एक महत्त्वाची आणि पर्यटकांची भिजण्याची हौस पुरविणारी नदी म्हणजे भातसा. शहापूर तालुक्यातील ही नदी खडवलीजवळ वेगाने वाहते आणि त्यामुळेच पर्यटकांची या परिसरात नेहमीच गर्दी असते.
खडवली रेल्वे स्थानकापासून पाच मिनिटाच्या अंतरावर खडवली नदी आहे. ही भातसा नदीच. पण खडवलीजवळ पर्यटक हिला खडवली नदीच म्हणतात. परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेला. हा परिसर डोळय़ात साठवून घ्यायचा आणि मग नदीपात्रात उतरायचे. खळखळ वाहणारी ही नदी पर्यटकांना मनमुरात आनंद देते. उन्हाळय़ात तर येथे पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. साप्ताहिक सुटीच्या दिवशी नदीचा परिसर एखाद्या जत्रेसारखा फुलून आलेला असतो.
नदीच्या काठावर खाऊची अनेक दुकाने आहेत. पर्यटक तेथील खाऊचा आस्वाद घेत नदीच्या पाण्यात डुंबतो आणि जलपर्यटनाचा आनंद घेतो. येथील काही जण पर्यटकांना टय़ूब-टायरही पुरवत असतात. साहसी पर्यटक या टायरचा उपयोग करून मनसोक्त पोहतात.
कसारा घाटाजवळ उगम पावणाऱ्या भातसा नदीला तसे वर्षभर पाणी असते. भातसा धरणातून पाणी सोडले जात असल्याने खडवलीजवळील परिसर नेहमीच जलमय असतो. या नदीत मोठमोठे खडक आहेत.. त्यामुळे नदी एखाद्या धबधब्यासारखी वाहत असते. खळखळणाऱ्या या नदीत पर्यटकांना काही औरच आनंद येत असतो. परंतु ही नदी वाहती असल्याने तिथे अपघातही अनेकदा होतात. नदीपात्रात खडक असल्याने आणि भोवरा असल्याने पर्यटक अडकून पडण्याचीही भीती असते. त्यामुळेच या नदीचा आनंद जरा जपूनच घेतला पाहिजे.
खडवली नदीजवळच स्वामी समर्थाचा मठ आहे. निरव शांततेचा अनुभव आणि आनंद घ्यायचा असेल, तर या मठाला जरूर भेट द्या. परिसर निसर्गरम्य आणि हिरवागार असल्याने येथे आल्यावर मन प्रसन्न वाटते.. एकूणच खडवलीचा परिसर खूपच रमणीय आणि निसर्गसंपन्न असल्याने पर्यटकांसाठी तो जणू स्वर्गच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा