अंबरनाथः अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या रोहित्र क्षमतावाढ करण्याच्या कामामुळे भार व्यवस्थापनाच्या प्रयोगात बुधवारी पडघा केंद्रात झालेल्या बिघाडाची भर पडली. ऐन तीन वाजता वीजपुरवठा खंडीत झाल्याने त्याचवेळी सुरू असलेल्या बारावीच्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षार्थी आणि शाळा व्यवस्थापनाचा जीव टांगणीला लागला होता. सुदैवाने पर्यायी विद्युत व्यवस्था पूर्ण वेळ सुरू राहिल्याने आणि इंटरनेट सुविधा सुरू असल्याने संकट टळले. मात्र एका महाविद्यालयात १० विद्यार्थ्यांची परीक्षा रखडली. महावितरणाला कल्पना देऊनही परिक्षा काळात खंडीत झालेल्या वीज पुरवठ्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षात वीज पुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. अनेकदा काही तांत्रिक बिघाड झाल्यास मोठा काळ अंधारात राहावे लागते. दोनच दिवसांपूर्वी अंबरनाथच्या आनंदनगर वाहिनीवरील रोहित्र क्षमता वाढवण्याच्या कामासाठी बंद घेण्यात आला. आठवडाभर अंबरनाथमध्ये चालणाऱ्या या कामाचा फटका बदलापूर पूर्वेतील नागरिकांना बसतो आहे.
भार व्यवस्थापनाच्या नावाखाली काही भागांचा वीज पुरवठा बंद केला जात असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यातच अचानक कुठेतरी तांत्रिक बिघाड होत असल्याने पुरवठा सुरू असलेल्या भागातही वीज बंद होते. गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट असून अंबरनाथ, बदलापूरसारख्या शहरांचे तापमान ४० अंशांवर जाते आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. मंगळवारी या कामाला सुरूवात झाल्यानंतर बुधवारीही हे काम सुरू होते. बुधवारी इयत्ता बारावीची माहिती तंत्रज्ञान विषयाची ऑनलाईन परिक्षा होती. सकाळी ११ ते दीड आणि दुपारी ३ ते ५.३० या दोन सत्रात ही परिक्षा होणार होती. त्यामुळे शाळा प्रशासनांनी महावितरणाला या काळात वीज पुरवठा बंद करून नये अशी मागणी शाळांनी केली होती.
धक्कादायक म्हणजे त्याच वेळी दुपारी ३ वाजता अंबरनाथ आणि बदलापुरातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला. महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विजय दुधभाते यांना याबाबत विचारले असता, पघडा केंद्रात बिघाड झाल्याने मोहोने, बदलापूर, शहापूर, जांभूळ, नेतिवली कल्याण, मुरबाड आणि टेमघर या वाहिन्यांवर परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याच वेळी दुसऱ्या सत्राची परिक्षा सुरू झाली. तर सायंकाळी पाच वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला.
अंबरनाथ पश्चिम येथील किंग लॉर्ड्स इंग्लिश महाविद्यालयात २५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. मात्र अचानक वीज गेल्याने येथील यंत्रणा कोलमडली. पर्यायी व्यवस्थेतून १५ विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालयाने पूर्ण केली. मात्र दहा विद्यार्थ्यांची परीक्षा रखडली. ही परीक्षा लवकरच होणार असून त्याबाबत शिक्षण विभागाला कळवले असल्याची माहिती संजीता वर्मा यांनी दिली आहे. मात्र अशावेळी वीज सुरळीत ठेवणे आवश्यक आहे, तशी मागणीही आम्ही केलेली असे इक्रा इंग्रजी शाळेच्या अझरा सिद्दिकी यांनी सांगितले. परिक्षा संपेपर्यंत अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील परिक्षा केंद्रातील विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापनाचा जीव मात्र टांगणीला लागला होता.