ठाणे : दसरा सणाच्या खरेदीसाठी रविवार सायंकाळी ठाण्यातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे शहरातील जांभळी नाका, गोखले रोड, नौपाडा, राम मारुती रोड आणि स्थानक परिसरातील रस्त्यांवर वाहनांचा संख्या वाढल्याने वाहतूककोंडी झाली. मंगळवारी दसरा सण आहे. परंतु आज, रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेकजण खरेदीसाठी बाहेर पडले. शहरातील जांभळीनाका, नौपाडा तसेच स्थानक परिसरात जागोजागी हार-फुले विकणारे बसले होते. कपडे दुकानदारांनी सवलती जाहिर केल्या असून तसे फलक दुकानाबाहेर लावले आहेत.
या सर्वच ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. यामुळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी झाली.ठाण्यातील बाजारपेठे या फुलांची मोठी आवक झाली आहे. त्याचबरोबर या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति किलोमागे झेंडूची फुले ४० रुपये तर, शेवंतीची फुले ८० रुपयांनी महाग झाली आहेत, अशी माहिती फूलविक्रित्यांनी दिली.