कल्याण पट्टय़ात कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था; दररोज ६ ते ७ हजार भाकऱ्यांचा खप

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

निवडणुकीचा प्रचार म्हटला की, कार्यकर्त्यांच्या खानपानाची व्यवस्था करणे आलेच. काही वर्षांपूर्वीपर्यंत वडापाववर भूक भागवणाऱ्या कार्यकर्त्यांचे आता बिर्याणीच्या पाकिटाशिवाय चालत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या काळात बिर्याणीच्या ऑर्डरी जोरात असतात. पण ठाणे, कल्याण, भिवंडी मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी मात्र, खापरीवरच्या तांदळाच्या भाकऱ्यांना पसंती दिली आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून दररोज सहा ते सात हजार भाकऱ्यांचा सर्वपक्षीय कार्यकर्ते फन्ना उडवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिळफाटा, २७ गाव, अंबरनाथ, बदलापूर या पट्टय़ातील कष्टकरी महिलांना मात्र चांगला रोजगार मिळाला आहे.

पेटत्या चुलीवर ठेवलेल्या खापरीवर शेकलेली भाकरी आणि सोबत चिकन किंवा मटणाचा रस्सा हा खरं तर मेजवानीचा बेत. परंतु, सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना अशी मेजवानी रोज झोडायला मिळत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या पट्टय़ात दररोज सहा ते सात हजार भाकऱ्यांचा खप होत असल्याचे या व्यवसायात असलेल्यांचे म्हणणे आहे.

शिळफाटा ते डोंबिवली तसेच अंबरनाथ, बदलापूर परिसरात खापरीवरच्या भाकऱ्या करणाऱ्या ७० ते ८० महिला आहेत. या महिला वर्षांचे बाराही महिने हा व्यवसाय करतात. मात्र निवडणुकीच्या हंगामात खापरीवरच्या भाकऱ्यांची मागणी वाढल्याने आता जवळपास साडेतीनशेहून अधिक महिला व मुली या कामात सक्रिय आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील देवीचा पाडा येथील व्यावसायिक कल्पना जगदीश म्हात्रे यांनी दिली. ‘यापूर्वी दोन चुलींवर खापरीच्या भाकरी तयार केल्या जात होत्या. तेथे चार ते पाच चुली वाढवून खापरीवरच्या भाकरी केल्या जात आहेत. आमच्याकडे दोन महिला पूर्वी काम करत होत्या. आता चार महिलांकडून हे काम करून घेतले जाते,’ असेही त्यांनी सांगितले.

उमेदवारांची ‘भोजनावळ’

दिवसभर प्रचारासाठी पायपीट करून थकलेल्या कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहारासाठी पूर्वी ढाबे किंवा हॉटेल येथे सोय केली जायची. परंतु यंदा निवडणूक आयोगाच्या पथकाने ढाबे व हॉटेलांतील मेजवान्यांवरही लक्ष ठेवले आहे. अशा ढाब्यांवर निवडणूक आयोगाचे पथक अचानक पोहोचते व कोणत्या उमेदवाराचे कार्यकर्ते आहेत, याची माहिती घेऊन त्या मेजवानीचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जातो. त्यामुळे उमेदवारांची पंचाईत होते. हे टाळण्यासाठी आता उमेदवारांनी आपल्या कार्यालयाच्या परिसरात चक्क भोजनकक्ष सुरू केले आहेत. या ठिकाणी आचाऱ्याला नेमून त्याच्याकडून दररोज जेवण बनवून घेतले जाते, तर भाकऱ्यांची ऑर्डर दिली जाते. त्यामुळे एकीकडे उमेदवारांचा खर्च कमी झाला आहे तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांना बसल्याजागी मेजवानी मिळू लागली आहे.

खापरीवरची भाकरी कशी?

खापरीवरची तांदळाची भाकरी सर्व बाजूने चुलीवर भाजलेली असते. मात्र ती खापरीवर ठेवलेली असल्याने करपत नाहीत. चुलीवर शेकण्यात येत असल्याने तिची चव आणखी वाढते. मटणासोबत खापरीवरची भाकरी नसेल तर ते भोजनच नाही, असा खवय्यांचा दावा असतो.

यासाठी लागणाऱ्या खापऱ्या बदलापूर गाव, घेसर गावातील कुंभारांकडून विकत आणल्या जातात. एक खापरी १०० रुपयांना मिळते. सध्या या खापऱ्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे.

भाकरीचे गणित

एक भाकरी १२ रुपयाला घाऊक विक्रेत्याला विकली जाते. ती भाकरी वितरक यजमानांना, उमेदवारांना १५ रुपयांना विकतो. एक महिला आणि तिच्या सहकारी ४०० ते ५०० भाकरी सकाळ ते रात्री उशिरापर्यंत करतात. या कामातून रोजंदार महिला रोज २०० ते ३०० रुपये मजुरी मिळते. अशा विविध ठिकाणच्या भाकऱ्या एकत्र करून त्या उमेदवारांची निवडणूक प्रचार कार्यालय, लग्नाच्या ठिकाणी पोहोच केल्या जातात, असे एका महिला व्यावसायिकाने सांगितले.

मटणाचा वाडगा

काही ठिकाणी भाकरीप्रमाणेच मातीच्या भांडय़ात शिजवलेल्या मटणालाही मागणी आहे. विशेष म्हणजे, प्रचारासाठी आलेल्या नेतेमंडळींना खूश करण्यासाठी खास मातीच्या छोटय़ा वाडग्यांत मटण तयार करून ते त्यांच्या ताटात वाढले जात आहे. आकाराने लहान असल्याने या वाडग्यात शिजवलेल्या मटणाची लज्जत आणखी वाढते, अशी माहिती किसन म्हात्रे या कार्यकर्त्यांने दिली.

Story img Loader