अंबरनाथः अंबरनाथ शहराच्या पाले भागात असलेल्या दोन गोदामांना बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अंबरनाथ शहराच्या रहिवासी भागापासून जवळच असलेल्या या गोदामांना लागलेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण होते. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. एमआयडीसी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या गोदामांमध्ये स्वच्छताद्रव्य आणि रंगांचा मोठा साठा असल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली आहे.

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात आनंद नगर भागात अतिरिक्त औद्योगिक वसाहत आहे. तर शेजारीच पाले गावाच्या जागेत नव्याने औद्योगिक वसाहत वसवली जाते आहे. त्याचवेळी काटई कर्जत राज्यमार्गाच्या शेजारीच पाले येथे मोठी नागरी वसाहत उभी राहिली आहे. येथेच असलेल्या आनंद सागर रिसॉर्टच्या मागच्या बाजूला एलको पेंट आणि बॉम्बे हायजीन नावाच्या कंपन्या आहेत. यापैकी एलको पेंट कंपनीत ऑइल प्रकारातील रंग, तर बॉम्बे हायजीन कंपनीत स्वच्छतेसाठी वापरले जाणारे साहित्य तयार केले जाते. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास या दोन्ही कंपन्यांना भीषण आग लागली. स्वच्छताद्रव्य आणि ऑईल प्रकारातील रंग असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्यामुळे कंपनीत असलेल्या पिंपाचे मोठमोठे स्फोट होऊ लागले. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ आणि कुळगा बदलापूर नगरपालिका, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी सहा गाड्यांच्या मदतीने सुमारे चार तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. रात्रीची वेळ असल्याने आणि गोदामामध्ये कुणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती औद्योगिक वसाहतीतील अग्नीशमन दलाचे यशवंत नलावडे यांनी दिली आहे. गोदामांमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकत होती. त्यामुळे आग विझवण्यात वेळ गेला. मात्र या दोन्ही कंपन्या आगीत भस्मसात झाल्या असल्याचे नलावडे यांनी सांगितले आहे. गोदामाला आग लागल्यानंतर शेजारच्या रहिवासी संकुलातील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली होती.

Story img Loader