ठाणे – नवरात्रौत्सावाच्या काळात रास-गरबा खेळण्याची इच्छा असते. पण, तो खेळता येत नसल्यामुळे काहींचा हिरमोड होतो. अशा व्यक्तींना रास-गरबा खेळता यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विशेष गरबा प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येतात. यंदाही नवरात्रौत्सवाच्या पंधरा दिवस आधीपासून या प्रशिक्षण कार्यशाळा सुरु झाल्या आहेत. नृत्य प्रशिक्षणाच्या ठिकाणी तसेच काही गृहसंकुलांमध्येही गरब्याचे प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत. या वर्गाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरात्रौत्सवात रास गरबा खेळण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून दृढ झाली आहे. अलिकडे या रास-गरब्याला वैविध्य प्राप्त झाले आहे. पूर्वी रास-गरबा ज्यांना यायचा तेच खेळायला जायचे. परंतु, आता समाजमाध्यमांवर नवरात्रौत्सवाच्या काही दिवस आधीपासून रास-गरबा कसा खेळला जातो, त्याची पद्धत काय याचे प्रशिक्षण देणारे चित्रफीत प्रसारित होतात. या चित्रफिती पाहून अनेकजण रास गरबा खेळण्याचा सराव करतात. परंतु अनेकांना चित्रफिती पाहूनही रास-गरबा खेळण्याची कला अवगत होत नाही. त्यामुळे ते रास-गरबा खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी कार्यशाळेत प्रवेश घेतात. शहरांमध्ये रास-गरबा खेळाचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळाही सुरू झाल्या आहेत. या कार्यशाळांमध्ये नवरात्रौत्सवाच्या पंधरा दिवस आधीपासून नोंदणी सुरू होते आणि त्यानंतर लगेचच नोंदणी करणाऱ्यांना रास-गरबा प्रशिक्षण देण्यास सुरुवात होते. यंदाही ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील काही नृत्य प्रशिक्षकांनी नवरात्रौत्सवाच्या पंधरा दिवस आधीपासून रास-गरब्याचे प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्या असून या कार्यशाळांमध्ये प्रवेश घेण्यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असल्याचे नृत्य प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले. रास-गरबा खेळण्याचे विविध प्रकार आहेत. परंतु, हे प्रकार अनेकांना माहीत नाही. हे सर्व प्रकार या प्रशिक्षण वर्गात शिकण्यास मिळतात. करोनानंतर प्रशिक्षण वर्गात जाऊन खास रास-गरबा शिकण्याचा प्रकार वाढला असल्याची माहिती एका प्रशिक्षकाकडून देण्यात आली.

हेही वाचा – भिवंडी शहराच्या नव्या रचनेचा प्रारूप आराखडा तयार, पालिकेने मागिवल्या नागरिकांकडून हरकती व सुचना

विशेष मुलंही घेतायत गरब्याचे प्रशिक्षण

ठाण्यातील प्रदीप सौदे हे गेले अनेक वर्षांपासून नृत्य प्रशिक्षण वर्ग घेत आहेत. गेल्या एक – दोन वर्षांपासून त्यांनी नवरात्रौत्सवात रास-गरब्याची कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. सात दिवसांच्या कार्यशाळेत गरबा कसा खेळला जातो, हे शिकविले जाते. प्रदीप हे अंध तसेच विशेष व्यक्तींना गरबा खेळण्याचे प्रशिक्षण देतात. यंदाही त्यांच्या प्रशिक्षण वर्गात काही विशेष मुले प्रशिक्षण घेत आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीत बनावट मोजणी नकाशाच्या आधारे ११ माळ्याच्या इमारतीची उभारणी; महाराष्ट्रनगर मधील विकासकावर गुन्हा

गृहसंकुलांमध्ये गरब्याचा सराव सुरु

ठाण्यातील काही बड्या गृहसंकुलात गरब्याचा सराव सुरु झाल्याचे दिसून येत आहे. पवारनगर भागात असलेल्या लोकपुरम या गृहसंकुलातील किंजल गोस्वामी यांनी गृहसंकुलात राहणाऱ्या महिलांसाठी खास गरबा प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. हे वर्ग २५ सप्टेंबरपासून सुरु झाले असून ते दररोज रात्री ८.३० ते रात्री १० यावेळेत होतात. गृहसंकुलातील ५० हून अधिक महिला या वर्गात गरब्याचे प्रशिक्षण घेत आहेत. अनेकांना गरबा खेळण्याची इच्छा असते. परंतु, गरबा खेळता येत नसल्याने काहीजण गरबा खेळण्याचे धाडस करत नाही, अशा महिलांसाठी खास मोफत हे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत, अशी माहिती किंजल यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge response to garba training in home complex in thane ssb