मनुष्यातला संवाद संपलाय, बोलण्याच्या कौशल्याचा विकासच खुंटतोय, ओरडल्याशिवाय न्याय मिळू शकत नाही.. उन्नत समाज व्यवस्थेला नायक लागतातच. सामाजिक चळवळीतूनच राजकारणाचा चेहरा निर्माण होतो. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण यांना वेगळे  करून चालणार नाही.. सणांना इव्हेंटचे स्वरूप आले आहे आणि जीवनामध्ये मनोरंजनाचा बाजारच निर्माण झाला आहे.., अशा शैलीदार शब्दांत सध्याच्या वास्तवावर टिप्पणी करणाऱ्या भाषणांनी ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’ची ठाण्यातील प्राथमिक फेरी गाजवली.
ठाण्यातील शिवसमर्थ शाळेच्या सभागृहामध्ये लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी गुरुवारी पार पडली. ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाच्या परीक्षणाबरोबरच कौतुकाची थाप दिली.
 दीड महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या लोकसत्ता वत्कृत्व स्पर्धेने महाविद्यालयीन तरुणांमध्ये मोठे आकर्षण निर्माण केले आहे. नृत्य, नाटय़, साहित्याच्या पलीकडे जाऊन युवकांमधील वत्कृत्व, वैचारिक बांधिलकी लोकांसमोर आणणाऱ्या या स्पर्धेचे गारुड ठाण्यातील फेरीसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये होते. ठाणे जिल्ह्य़ातील ३२ महाविद्यालयांतील ६०हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सकाळपासूनच तरुणांची रीघ स्पर्धेच्या ठिकाणी सुरू होती. घोषवाक्य, कविता आणि म्हणींच्या बरोबरीने विषय मांडणीचा प्रभावी प्रयोग तरुणांनी यावेळी सादर केला. व्यासपीठावरील स्पर्धकांना इतर उपस्थित स्पर्धक टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन देत होते. पालक, वाचक, प्राध्यापक आणि शिक्षकांनीही स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. आपल्याला नायक का लागतात? सामाजिक चळवळींचा राजकीय परिणाम, अतिसंपर्काने काय साध्य?, जगण्याचे मनोरंजनीकरण आणि जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत? अशा विषयांवर मतमतांतरे या स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी मांडली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. मीनल सोहनी, अरुंधती भालेराव आणि प्रा. अरुण मैड यांनी काम पाहिले. लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेच्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीमध्ये मुलींची संख्या लाक्षणिक होती. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील महाविद्यालयांतील तरुणींनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला होता. विषयांची मुद्देसूद मांडणी, नेटके सादरीकरण या स्पर्धेत सहभागी तरुणींनी घडवल्याचे मत परीक्षकांनी मांडले.     

Story img Loader