ठाणे : घोडबंदर मार्गावर बुधवारी सकाळ पासून वाहने बंद पडल्याने आणि अपघातामुळे या मार्गावर गायमुख ते वर्सोवा पुलपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागत आहे. घोडबंदर हा मार्ग गुजरात, बोरिवली येथील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. बुधवारी पहाटे या मार्गावर तीन वाहने बंद पडली होती. तर एका वाहनाचा अपघात झाला होता.
घोडबंदर मार्ग वाहतुकीसाठी अरुंद आहे. त्यात वाहने बंद पडल्याने गायमुख ते वर्सोवा पुला पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. बोरिवली, वसई भागातून अनेकजण ठाणे, घोडबंदर परिसरात कामानिमित्त येत असतात. तसेच ठाण्याहून देखील बोरीवली, वसई, विरार, गुजरातच्या दिशेने वाहतूक होत असते. परंतु वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचणे शक्य झाले नाही. वाहनचालकांना अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागत आहे. अनेक एसटी आणि महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्या कोंडीत अडकून आहेत. वाहतूक कोंडीमुळे महिलांचे सर्वाधिक हाल झाले आहेत.