रेल्वे पोलीस आणि पोलीस मित्रांच्या संघटनेची मोहीम
ठाणे-कळवा, ठाकुर्ली, कर्जत आणि मध्य रेल्वेच्या अन्य काही स्थानकांत रूळ ओलांडले जात असलेल्या भागात जाऊन रेल्वे पोलीस आणि पोलीस मित्र संघटना यांच्या मदतीने ‘बी-सेफ’ ही मोहीम राबवण्यात आली. मंगळवारी सकाळी जमलेल्या पोलीस मित्रांनी रेल्वे रूळ ओलांडू नका, पादचारी पुलांचा वापर करा, गाडीच्या दारातून प्रवास करू नका, चालत्या गाडीत चढू अथवा उतरू नका, अशी जनजागृतीपर माहिती प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या मंडळींनी रेल्वे रुळांच्या बाजूने मानवी साखळी करून प्रवाशांना रेल्वे रुळांवर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांसोबत या मंडळींचे खटके उडाल्याचाही प्रकार समोर आला आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मोहिमा आखल्या जात असून प्रवाशांनी या सूचनांचे पालन करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे पोलीस प्रशासनाने यावेळी केले.
डोंबिवली स्थानकातून मुंबईत जाणाऱ्या धनश्री गोडवेचा लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू आणि भावेश नाकतेच्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या वतीने वेगवेगळे प्रयत्न हाती घेतले जात आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीनेही यासाठी प्रयत्न केले जात असून, प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी आवाहन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलीस प्रशासनाने ‘बी-सेफ’ मोहीम हाती घेतली असून, पोलीस मित्रांच्या मदतीने रेल्वे रुळांच्या बाजूला जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. मंगळवारी या मोहिमेअंतर्गत रेल्वे रुळांच्या बाजूला मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे, ठाकुर्ली, कर्जत आणि अन्य स्थानकात ही मानवी साखळी करण्यात आली.

खोळंबलेल्या प्रवाशांचा संताप..
ठाकुर्ली स्थानकात जाण्याच्या फाटकावर मानवी साखळी करून पोलीस मित्रांनी येथून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखून धरले. मात्र घाईघाईने रूळ ओलांडणाऱ्यांनी या पोलीस मित्रांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या भागात उपलब्ध असलेला पादचारी पुल अपुरा असून त्यावरून स्थानकावर जाताना चेंगराचेंगरी होत असते. तर दुसरीकडे कल्याणकडच्या भागामध्ये पादचारी पूलच नाही, त्यामुळे आम्ही स्थानकात पोहचायचे कसे, असा सवाल या प्रवाशांनी निर्माण केला. त्यावर पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेसाठी प्रवाशांनी वेळ लागला तरी चालेल मात्र जीव धोक्यात घालू नये असे सुचवले. घरच्यांना तुमची गरज असून असे प्रकार थोपवण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. या सर्व स्थानकांमध्ये प्रत्येक ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.