ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीकरीता आणखी प्रशिक्षित शंभर वाहतूक सेवक दिले जाणार आहे. यासंबंधीचे संकेत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दिले. तसेच वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने अवजड वाहनांसाठी ठाणे शहराच्या हद्दीबाहेर नवीमुंबई, मीराभाईंदर या ठिकाणी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वंकष चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस घोडबंदर रोड येथील ‘जस्टीज फॉर घोडबंदर रोड’ फोरमचे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी वाहतूक सेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी प्रशिक्षित शंभर वाहतूक सेवक तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल. वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनेही नियोजन केले जाईल, असेही आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे आणि झाडांच्या फांद्या छाटणे, नालेसफाई अशी कामे लवकरात लवकर हाती घेण्यात येतील असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले. घोडबंदर रस्त्यावर ज्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत, ती कामे करत असताना तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बंद करणे आवश्यक आहे, परंतु तसे होत नसल्याने रस्त्याचे काम नीट होत नाही आणि रस्ता उंच सखल होत असल्याबाबतचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला. यावर रस्त्याचे काम झाल्यानंतर काही कालावधीसाठी वाहतूक बंद करता येईल किंवा कसे याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. दरवर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडतात अशी ठिकाणे शोधून तेथे काँक्रिटीकरण करण्याच्या सुचना आयुक्तांनी केल्या. सद्य:स्थितीत सेवा रस्त्यांवर जी कामे सुरू आहेत, ती सुरूवातीपासून शेवटपर्यत पूर्ण करावीत, कामात तारतम्य ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. घोडबंदर रस्त्यावर लेन मार्किंग, झेब्रा क्राँसिग करण्यात आले आहे. परंतु धुळीमुळे ते खराब झाले असल्याने त्या ठिकाणी पुन्हा रंगाचे पट्टे करावेत असेही आदेश त्यांनी बैठकीत दिले. घोडबंदर रस्त्यावरील किंबहुना महापालिका क्षेत्रातील आवश्यक कामे नियमितपणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
घोडबंदर रोडवरील कचरा हा सकाळ संध्याकाळ अशा दोन सत्रात उचलला जात असला तरी अनेक ठिकाणी नागरिक कचरा टाकतात, अशा नागरिकांना दंड लावण्याची मागणी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली. तसेच येत्या काही दिवसात घोडबंदर भागातील रस्त्यांची सफाई यांत्रिकी पध्दतीने करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त मनिष जोशी यांनी स्पष्ट केले.
© The Indian Express (P) Ltd