अभियंत्यांच्या इच्छाशक्तीने ठाणे जिल्ह्य़ात अभिनव उपक्रम
नोकरी-व्यवसायात कार्यरत असताना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग राष्ट्र उभारणीसाठी देण्याचा निर्धार करून कार्यरत असलेल्या तरुण अभियंत्यांनी जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील शंभर शाळांमध्ये स्वच्छतागृहे उभारली आहेत. शंभरावे स्वच्छतागृह शहापूर तालुक्यातील नडगाव हायस्कूलच्या आवारात बांधण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी या स्वच्छतागृहांचे उद्घाटन होणार आहे.
‘इंजिनीअर्स विथआऊट बॉर्डर्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या शीर्षकाखाली हे तरुण अभियंते कार्यरत आहेत. ४५ देशांमध्ये ४५० प्रकारच्या समाजपयोगी प्रकल्पांमध्ये संस्थेचे काम सुरू आहे. ७५० अभियंता श्रेणीतील युवक संस्थेचे सभासद आहेत. मुंबईतील झोपडपट्टय़ा, ठाणे जिल्ह्य़ातील दुर्गम भागातील शाळा, परिसराची पाहणी केल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळांच्या आवारात स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. जिल्हा परिषद, आश्रमशाळांना शासकीय निधी उपलब्ध असतो. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातील खाजगी शाळांमध्ये सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला. ठाणे जिल्ह्य़ाच्या विक्रमगड, वाडा, शहापूर, मुरबाड या भागातील माध्यमिक शाळांच्या आवारात स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी ‘ईडब्ल्यूबी’ संस्थेने घेतला.
शहापूरमधील डोळखांब, बामणे, शाई, साकडबाव, पडवळपाडा, टेंभुर्ली, चांगेपाडा, चरीव, गुंडेगाव अशा दुर्गम गावांमधील शाळांच्या आवारात स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.
स्वच्छतागृह उभारणीचा बांधकाम आराखडा संस्थेने कायमस्वरूपी करून ठेवला आहे. त्याआधारे नेमून दिलेला गवंडी तीन आठवडय़ांत स्वच्छतागृह उभारणीचे काम पूर्ण करतो. संस्थेतील सदस्य अभियंता असल्याने काम करताना कोणतीही त्रुटी किंवा काम निकृष्ट होणार नाही याची खबरदारी पाया खणल्यापासून घेण्यात येते. कामाचा दर्जा पाहिल्याशिवाय गवंडी व साहित्य पुरवठादाराचे देयक काढण्यात येत नाही.
-जॉय देसाई, संचालक, इंजिनीअर्स विथआऊट बॉर्डर्स