मालिका, चित्रपटांत काम देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा; तरुणास अटक

ठाणे : जाहिरात कंपनी, मालिका, चित्रपटांमध्ये काम मिळवून देतो अशी बतावणी करून सुमारे १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या एका भामटय़ाला मंगळवारी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाचने अटक केली आहे. संदीप व्हरांबळे असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नवी मुंबई, गोवा, पणजी येथील विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे एकूण १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डोंबिवली भागात राहणारे रवींद्र कुलकर्णी यांचा १० वर्षांचा मुलगा विविध टीव्ही मालिकांमध्ये काम करतो. ६ जुलैला रवींद्र यांना संदीप व्हरांबळे याचा फोन आला होता. ‘मी दिग्दर्शक असून तुमच्या मुलाला एका जाहिरातीत काम देतो,’ असे त्याने रवींद्र यांना सांगितले. त्यानंतर संदीपने रवींद्र यांची ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये भेट घेतली. त्या वेळी संदीपने रवींद्र यांच्या मुलाचे पोर्टफोलिओ बनवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे मागितले. त्यानंतर काही दिवसांत रवींद्र यांनी संदीपच्या खात्यामध्ये ११ हजार रुपये भरले. त्यानंतर त्यांच्या घरी एक छायाचित्रकार आला. त्याने रवींद्र यांच्या मुलाचे छायाचित्र काढले. मात्र, २० ते २५ दिवस उलटूनही संदीपने त्यांना मुलाचा पोर्टफोलिओ बनवून दिला नव्हता. तसेच संदीपचा फोनही बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रवींद्र यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाचकडून सुरू होता. दरम्यान, संदीप हा कासारवडवली येथे राहत असल्याची माहिती युनिट पाचचे उपनिरीक्षक भूषण शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून संदीपला अटक केली. संदीपने १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची अशाच प्रकारे फसवणूक केली असून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. तसेच त्याच्याविरोधात कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नवी मुंबई, गोवा, पणजी येथील विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.