डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोनमध्ये शिळफाटा रस्त्याकडेच्या जलवाहिनीवरील व्हाॅल्व्हमधून मागील काही दिवसांपासून पाण्याती गळती सुरू आहे. दररोज शेकडो लीटर पाणी या व्हाॅल्व्हमधून वाया जात असल्याच्या तक्रारी या भागाील उद्योजक, नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
जलवाहिन्यांमधून सकाळ, संध्याकाळ पाणी सुरू झाले की व्हाॅल्व्हमधील गळतीच्या पाण्याचा प्रवाह अधिक असतो. डोंबिवली, कल्याण शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई आहे. अशा परिस्थितीत दररोज शेकडो लीटर पाणी फुकट जात असताना त्याकडे एमआयडीसीचे अधिकारी लक्ष का देत नाहीत, असे प्रश्न नागरिक करत आहेत. या जलवाहिनीच्या बाजुला कंपन्या आहेत.
या पाण्याच्या गळतीमुळे या भागात चिखल झाला आहे. परिसरातील झोपडपट्टीधारक दिवसा या गळती होत असलेल्या व्हाॅल्व्हमधून घरातील पाणी भरून ठेवतात. काही वाटसरू या जलवाहिनीवरून पडणाऱ्या पाण्यातून आपली तहान भागवतात. काही वाहन चालक गळक्या व्हाॅल्व्हजवळ वाहने उभी करून वाहने धुतात. परिसरातील भटकी गुरे या भागात साचलेल्या तळ्यात पाणी पिण्यासाठी येतात.
काही जागरूक नागरिकांनी याप्रकरणी पालिका, एमआयडीसीकडे तक्रारी केल्या आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी याप्रकरणी एमआयडीसीला कळवा असे नागरिकांना सांगितले आहे. एमआयडीसीतही काही काही उद्योजक, जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे उद्योजकांना खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले व्हाॅल्व्हची गळती थांबविण्यासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करावा लागणार आहे. केवळ एका कामासाठी बंंद घेतला तरी त्याची झळ इतर भागाला बसते. त्यामुळे योग्य नियोजन करून या जलवाहिनीवरून व्हाॅल्व्हमधील गळती थांबविण्यासाठी इतर दुरुस्तीची कामे पाहून पाणी पुरवठा बंदचा निर्णय घेतला जाईल त्यावेळी हे काम केले जाईल.