कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील एक माजी नगरसेवक आणि एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाच्या मुलाने बनावट कागदपत्रांच्या आधारे जुनी डोंबिवली, ठाकुरवाडी भागात तीन ते चार बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. या बेकायदा इमारती उभारताना बनावट कागदपत्रे तयार करून या कागदपत्रांची सह दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करण्यात आली आहे. या बेकायदा इमारतींवर कारवाई करावी म्हणून मागील पाच वर्षापासून पालिका, महसूल विभागाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात येत नाही. म्हणून एका जागरूक नागरिकाने मागील सहा दिवसांपासून मुंंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
डोंबिवली पश्चिमेत बेकायदा इमारती उभारणाऱ्या माजी नगरसेवक, एका माजी नगरसेवकाचा मुलगा आणि इतर २२ जण, याशिवाय ठाकुरवाडी नेमाडी गल्लीत बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या भूमाफियां विरुध्द बनावट सात बारा उतारा तयार करणे, बांधकामांची खोटी कागदपत्रे तयार करणे, या कागदपत्रांचे सह् दुय्यम निबंधक ४ कार्यालयातून दस्त नोंदणी करणे. ही कागदपत्रे अधिकृत असल्याचे दाखवून या बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री करण्यात आली आहे. या माध्यमातून कल्याण डोंबिवली पालिका, महसूल विभागाचा लाखो रूपयांचा महसूल बुडाला आहे,असे उपोषणकर्ते विनोद गंगाराम जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणले आहे.
या बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफियांंविरुध्द पालिका, महसूल विभाग,वरिष्ठ दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी गु्न्हे दाखल करावेत. या बेकायदा इमारती जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी उपोषणकर्त्याची आहे. जुनी डोंबिवलीतील एका जमिनीच्या भूक्षेत्राशी एक माजी नगरसेवक, एका माजी नगरसेवकाचा मुलगा आणि त्यांचा समर्थक यांचा काहीही संबंध नाही. तरीही त्या सात बारा उताऱ्यावर नियमबाह्यपणे या तीन जणांची नावे घुसविण्यात आली आहेत, असे जोशी यांनी म्हटले आहे.
गृह विभाग दखल
राज्याच्या गृह विभागाच्या कक्ष अधिकारी पुष्पा रावण यांनी पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून आझाद मैदानात डोंंबिवलीतील बेकायदा इमारतींच्या विषयावरून उपोषणावरून बसलेल्या विनोद जोशी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून झालेल्या कार्यवाहीचा अहवाल गृह विभागाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वीच आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, आताच्या तक्रारीच्या अनुषंगाने बनावट कागदपत्रांच्या विषयी गुन्हा दाखल करण्याचा विषय हा महसूल किंवा पालिका नगररचना अधिकाऱ्यांच्या अखत्यारित येतो. वरिष्ठांचे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू. राजेश सावंत साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.
मागील चार ते पाच वर्षापासून जुनी डोंबिवली, ठाकरवाडी आणि परिसरातील बेकायदा बांधकामे, बनावट कागदपत्रांंच्या आधारे उभारण्यात आलेल्या बेकायदा इमारतींच्या तक्रारी आपण पालिका, महसूल, शासनाकडे केल्या आहेत. कोणीही त्याची दखल घेत नाही म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. विनोद गंगाराम जोशी उपोषणकर्ता, डोंबिवली