कल्याण – भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामंचायतीमध्ये सदस्यांकडून गैरकारभार सुरू आहे. या गैरकारभाराची चौकशी शासनस्तरावरून करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पडघा येथील ग्रामविकास सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
पडघा ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक, सरपंंच आणि इतर सदस्य मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. याविषयाची चौकशी करावी म्हणून शासनाकडे अनेक तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही, म्हणून ग्रामविकास संस्थेने हे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात सहभागी होऊ नये म्हणून संस्थेच्या सदस्यांवर विविध प्रकारचा दबाव आणण्यात आला. काही सदस्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले.
पडघा ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमिनींवर बेकायदा बांधकामे केली जात आहे. या बांधकामांवर ग्रामविकास अधिकारी भास्कर घुडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई करत नाहीत. बाजार कर गेल्या पाच वर्षांत शासकीय तिजोरीत भरणा करण्यात आलेला नाही. पडघा येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी १४ कोटी खर्च करण्यात आले आहेत. या योजनेची निकृष्ट अंमलबजावणी केली त्यामुळे पडघ्यातील पाणी समस्या कायम आहे. पडघा ग्रामपंचायतीमधील दिव्यांग व्यक्तींना २०१८ ते २०२२ पर्यंत लाभार्थी हप्ता देण्यात आलेला नाही. या प्रकरणात गैरप्रकार करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पडघा येथील जलशुद्धीकरण टाक्या बंद आहेत. तरीही न्यायालयात हे प्रकल्प सुरू असल्याची खोटी माहिती देण्यात आली आहे. घरपट्टी शासकीय नियमाने आकारावी. ग्रामसभेत ठराव केले जातात, पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही, असे ग्रामविकास सामाजिक संस्थेचे सुनील पाटील यांनी सांगितले.
या उपोषणात संंस्थेचे सुनील पाटील, मनोज गुंजाळ, जयेश जाधव आणि इतर सदस्य सहभागी झाले आहेत. जोपर्यंत संस्थेच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हे बेमुदत साखळी उपोषण सुरू राहील, असे पाटील यांनी सांगितले. पोलीसही हे उपोषण बंद करावे म्हणून दबाव टाकत असल्याचे सदस्यांनी सांगितले.
हेही वाचा – मुरबाडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा फलक
ग्रामविकास सामाजिक संस्थेच्या सदस्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी त्यांना चर्चेला बोलविले आहे. त्यांंनी प्रतिसाद दिला तर त्यांच्या मागण्या मार्गी लागू शकतात. – भास्कर घुडे, ग्रामविकास अधिकारी, पडघा ग्रामपंचायत.