ठाणे : भिवंडी येथील निजामपूरा भागात शनिवारी पहाटे घराला आग लावून पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. निजामपूरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निजामपूरा येथील कसाईवाडा परिसरात फरिन आणि आसिफ कुरेशी हे राहतात. शनिवारी दोघेही घरामध्ये झोपले असताना पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या घरावर ज्वलनशील पदार्थाने आग लावण्यात आली. ही आग घरामध्ये पसरू लागली. तसेच धूर निर्माण झाला.
दोघांनाही जाग आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड करण्यास सुरूवात केली. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यात फरिन यांच्या हाताच्या पंजाला भाजले. आरडा-ओरड ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. घराचा दुसरा दरवाजा उघडून त्यांनी दोघांना घराबाहेर काढले. फरिन यांना उपचाारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निजामपूरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. निजामपूरा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री उशीरा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते.