पती पत्नीचं भांडण आणि त्यानंतर दोघांपैकी एकाने टोकाचा निर्णय घेणं हे आता कुठल्या थराला जाईल सांगताच येत नाही. अशाच एका प्रकाराने डोंबिवली हादरली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादाचा धक्कादायक कळस गाठण्याचा प्रकार डोंबिवलीतल्या एका उच्चभ्रू इमारतीत घडला आहे. या इमारतीत राहणाऱ्या एका माणसाने त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केले आहेत. ज्यानंतर पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी पतीसह त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे आणि तपास सुरू केला आहे.
डोंबिवलीतल्या उच्चभ्रू सोसायटीतली घटना
डोंबिवली पूर्व भागात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत पीडित महिला आपल्या पतीसोबत राहत होती. जून २०२० मध्ये या दोघांचं लग्न झालं. मात्र गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरू झाले होते. याच दरम्यान पतीने पत्नीचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. पत्नीला सगळा प्रकार समजला ती संतापली आणि तिने पतीला जाब विचारला तेव्हा त्याने तिला मारहाण केली.
माझा पती भिवंडीतल्या एका तरूणीशी लग्न करणार आहे अशी माहिती पीडित महिलेला मिळाली. याविषयी विचारलं असता पीडितेच्या पतीसह त्याच्या कुटुंबाने या महिलेला शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. त्यानंतर या प्रकरणात पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
पीडित महिलेचे आरोप अत्यंत गंभीर
पीडित महिलेच्या पतीचं नाव महेश असं आहे. महेशने एका रात्री आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवत असतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो १० मार्चला सोश मीडियावर व्हायरल केला. एवढंच नाही तर महेशचं आधी एक लग्न झालं होतं. तिच्याशी फारकत घेतल्यानंतर त्याने माझ्याशी लग्न केलं असंही या पीडितेने सांगितलं आहे. तसंच भिवंडीतल्या एका तरूणीशी गुपचूप साखरपुडाही उरकला आहे. या दोघांच्या लग्नाची तारीखही ठरली आहे. याबाबत माझ्या सासऱ्यांना मी विचारलं असता त्यांनी मला शिवीगाळ केली. महेशला सोडून दे, त्याचं लग्न होऊ दिलं नाहीस तुला जिवंत ठेवणार नाही अशीही धमकी पीडितेला देण्यात आली. तसंच तुझे आई वडील, भाऊ, बहीण यांच्यासह सगळ्या नातेवाईकांना ठार मारू अशीही धमकी देण्यात आल्याचं पीडितेने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. मुंबई तकने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.