लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: कळवा खाडी परिसरात खारफुटीवर भराव टाकून अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेवर दुमजली झोपड्या उभारण्याची कामे सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने गुरुवारी झोपड्या हटविण्याची मोहिम हाती घेतली. यामध्ये दिवसभरात ६५ झोपड्या हटविण्यात आल्या असून नागरिकांच्या विरोधाला झुगारत पालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.

ठाणे शहराचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरात रस्ते बांधणी, उड्डाण पुल उभारणी, सॅटीस पुल, तलावांचे सुशोभिकरण, असे अनेक प्रकल्प महापालिकेकडून राबविले जात आहे. ठाणे शहराला ३२ किमीचा खाडीकिनारा लाभलेला आहे. या भागातील खारफुटीवर भराव टाकून त्यावर बेकायदा बांधकामे उभारणीचे प्रकार भुमाफियांकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. कळवा, साकेत परिसरात खाडी बुजवून त्याठिकाणी बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… कल्याणमध्ये विद्यार्थ्यांकडून एक कोटी सूर्यनमस्कारांच्या लक्षांकाला प्रारंभ

खाडी पात्रापर्यंत या झोपड्या पोहचल्या आहेत. याठिकाणी दुमजली झोपड्या उभारण्यात येत असल्याने मोठी जिवीतहानी होण्याची भिती व्यक्त होत होती. तसेच खाडीचे पात्र अरुंद होण्याबरोबरच अतिक्रमणामुळे खारफुटी नष्ट झाल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस या झोपड्यांची संख्या वाढत असून यामुळे खाडीचे पात्र अनेक ठिकाणी अरुंद झाले आहे. या झोपड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत होते. या संबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ ने प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन ठाणे महापालिकेने गुरूवारपासून झोपड्यांवर कारवाई सुरु केली आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत आनंदनगरमध्ये सामासिक अंतर न सोडता सात माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी

महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईस तेथील नागरिकांकडून विरोध झाला. या विरोधाला झुगारत पालिकेच्या पथकाने झोपड्या हटविण्याची कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने झोपड्या हटविण्यात आल्या. दिवसभरात ६५ झोपड्या हटविण्यात आल्या असून यापुढे सुद्धा ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huts in thane creek were removed by the thane municipal administration dvr
Show comments