बदलापूरः मी राज्य विधीमंडळाचा सदस्य आहे, मी राज्याचा आमदार आहे. त्यामुळे मला अधिकार मिळाला आहे. मी जनेतेचे प्रश्न मांडतो आणि मांडत राहणार, असे स्पष्ट मत मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मांडले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपला मतदारसंघ सोडून इतरांच्या मतदारसंघात निधी देण्यावरून किसन कथोरे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केले होते. बैठकीला अनुपस्थित असलेल्या किसन कथोरे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताा याबाबत आपली बाजू स्पष्ट केली.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाड विधासनभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गेल्या काही महिन्यांपासून उघड युद्ध सुरू आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी स्वतःचा मतदारसंघ सोडून इतरांच्या मतदारसंघात निधी देता येऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित करत आमदार किसन कथोरे यांनी इतर मतदारसंघात दिलेल्या निधीवर बोट ठेवले. यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनीही, आमच्या मतदारसंघात निधी दिला जात असेल तर आम्ही काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला. कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना दुसऱ्याच्या मतदारसंघात निधी देणे म्हणजे स्थानिक आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे असल्याचे सांगून हे प्रकार बंद करण्याची विनंती केली.
हेही वाचा >>> ठाण्यात वाहन थकीत दंड वसुलीसाठी लोकअदालत; दंडाची रक्कम होणार कमी
आमदार कथोरे यांच्या कार्यपद्धतीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कथोरे या बैठकीत नव्हते. परराज्यात असलेले कथोरे यांनी शुक्रवारी परतल्यानंतर माध्यमांसमोर या सर्व प्रकारावर आपली बाजू मांडली. मी राज्य विधिमंडळाचा सदस्य असून राज्याचा आमदार आहे. त्यामुळे मी नागरिकांचे प्रश्न मांडत राहणार असे सांगत मला अधिकार प्राप्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मी ज्या बैठकीत नाही त्या बैठकीत माझ्याबाबत चर्चा करणेही चुकीचे असल्याचे मत यावेळी कथोरे यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री पाटील यांच्याशी सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना, वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे. ते बोलवतील आणि आम्ही यावर चर्चा करू असेही कथोरे यावेळी म्हणाले.
कल्याणला जाण्याचा प्रश्नच नाही
माझा मतदारसंघ चागला आहे. येथील नागरिकांनी मला २० वर्षे प्रेम दिले आहे. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही युतीमध्यो आहोत. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात जाण्याचा प्रश्नच नाही, असे कथोरे यांनी स्पष्ट केले. हेतुपुरस्करपणे बातम्या पसरवल्या जात असून काही वाद असतील ते बसून सोडवू, असेही मत कथोरे यांनी व्यक्त केले. कथोरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवतील अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर कथोरे यांनी पूर्णविराम लावला.