नुकताच गाजलेला ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ या चित्रपटात दाजी खरे ही भूमिका जिवंत करणारा अभिनेता अंगद म्हसकर ‘हृदयी प्रीत जागते’ या मालिकेतही अलीकडेच प्रेक्षकांसमोर आला होता. त्याची टीव्हीवरील सर्वाधिक गाजलेली भूमिका अर्थातच ‘बाजीराव मस्तानी’ मालिकेतील बाजीरावाची होती. तिथून अंगदने प्रेक्षकांबरोबरच अनेक निर्माते-दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले होते. लवकरच अंगद ‘जयोस्तुते’ या मालिकेत कॅप्टन अजिंक्य सरनाईक या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. अस्सल ठाणेकर ही त्याची ओळख. विष्णुनगर नौपाडा येथे त्याचे बालपण गेले. त्यानंतर तो गोकुळनगरात राहायला आला. सध्या वृंदावन सोसायटीत वास्तव्याला असणाऱ्या अंगल याला आपण अस्सल ठाणेकर असल्याचा अभिमान आहे.
माझी नाटके – ‘गिधाडे’, ‘ती फुलराणी’, ‘ऑल दी बेस्ट’, ‘गारंबीचा बापू’ या नाटकांतील बापूची भूमिका ही माझी गाजलेली नाटके आहेत. त्याचबरोबर ‘बूढ्ढा होगा तेरा बाप’ हेही नाटक बऱ्यापैकी गाजले.
’माझ्या मालिका – बाजीराव मस्तानी या मालिकेतील बाजीराव ही मालिका पदार्पणातच ऐतिहासिक भूमिका साकारायला मिळण्याचे आव्हान मला पेलायला मिळाले हे माझे भाग्य होय. ‘मड्डम सासू ढढ्ढम सून’ या मालिकेत विनोदी भूमिका करायला मिळाली. तर ‘गुंतता हृदय हे’ या मालिकेत गूढ आणि खलनायकी वाटेल अशा स्वरूपाची अतिशय निराळी छटा दाखविणारी भूमिका लोकांना आवडली होती. ‘तू तिथे मी’मधील साहाय्यक कलावंताची भूमिका, तसेच ‘हृदयी प्रीत जागते’मधील एका गायकाच्या आयुष्यावरची प्रमुख भूमिका अशा वेगवेगळ्या छटांच्या भूमिका मालिकांमधून साकारायला मिळाल्या.
’माझे चित्रपट – ‘देख तमाशा देख’ हा हिंदी चित्रपट, ‘बालगंधर्व’मधील छोटीशी व्यक्तिरेखा आणि आता ‘लोकमान्य..’मधील दाजी खरे या भूमिका चित्रपटातून साकारण्याची संधी मिळाली.
’आवडता हिंदी चित्रपट – अमिताभचा ‘अग्निपथ’
’आवडता मराठी चित्रपट – अशी ही बनवाबनवी
’आवडतं नाटक- नकळत सारे घडले, सुखांशी भांडतो आम्ही
’आवडतं गाणं – खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, ऐ जिंदगी गले लगा ले
’आवडता अभिनेता – कमल हसन
’आवडती अभिनेत्री – माधुरी दीक्षित
’शॉपिंगचं आवडतं ठिकाण – स्पोर्ट्स अ‍ॅक्सेसरीजसाठी वगैरे कासारवडवली हायपरसिटी मॉलमधील डिकॅथ लॉन हे दुकान
’आवडता फूड जॉइण्ट्स – दगडी शाळेच्या कोपऱ्यावरचे ‘स्वामी किचन’
’आवडतं हॉटेल – शेल्टर
’पिकनिक स्पॉट – येऊर
’कोणतं माध्यम अधिक आवडतं – तिन्ही माध्यमांची निरनिराळी वैशिष्टय़ं आणि बलस्थानं आहेत. मालिकेमधील प्रमुख भूमिका यामुळे कलावंत सतत लोकांच्या समोर राहतो. त्याचबरोबर आर्थिकदृष्टय़ाही मालिकेवर तुमची रोजीरोटी चांगली चालू शकते हा मुद्दाही महत्त्वाचा आहेच. नाटक आपल्यातील कलावंताला समाधान देणारं असतं, तर सिनेमामधील भूमिका अधिक लोकांपर्यंत पोहोचते. बराच काळ लोकांच्या लक्षात राहू शकणारी भूमिका सिनेमातून करायला मिळाली तर ‘सोने पे सुहागा’ ठरेल.
’कोणती भूमिका साकारायला आवडेल – ऐतिहासिक नाटके, गाजलेली जुन्या काळातील नाटके यांचे पुनरुज्जीवन केले तर दिग्गजांनी साकारलेल्या भूमिका करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका नाटकांतून साकारायला नक्कीच आवडेल. खरे सांगायचे तर आता सध्या माझे लक्ष्य हे मला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या भूमिका हे नक्कीच आहे. त्याचबरोबर माझ्या लुक्समुळे संपूर्णपणे खलनायकी भूमिका साकारायची खूप इच्छा आहे.
’ठाणे शहराविषयीची गोष्ट : जन्मापासून ठाण्यातच राहत असल्याने असेल किंवा जुना नौपाडा परिसरात राहिलेला असल्यामुळे ठाणे सोडून दुसरीकडे राहायला जाण्याची कल्पनाच करता येत नाही. विष्णुनगरमधील सत्यम कलेक्शनचा नाका हा विष्णुनगर, घंटाळी परिसरात वर्षांनुवर्षे वास्तव्य असलेल्या सर्वाचाच तरुणपणातील ‘वीक पॉइण्ट’चा विषय ठरतो. ठाण्यातच लहानाचा मोठा झाल्यामुळे गडकरीमधील प्रयोगानंतर भेटणारे प्रेक्षक असोत की ठाण्यात आजही भटकताना भेटणारे लोक असोत, सगळे आपुलकीने चौकशी करताना, शहर-महानगर बनलं तरी ठाणेकरांची आपुलकी आजही तशीच अनुभवास येते. यामुळे कामाच्या निमित्ताने मुंबईत तसेच मढ आयलंड किंवा आणखी पश्चिम उपनगरांतील स्टुडिओ असे कुठेही लांब जायला लागत असले तरी ठाणे सोडून दुसरीकडे राहायला जाण्याचा विचार मनात येत नाही. अस्सल ठाणेकराची ही ठाणे शहराशी असलेली बांधीलकी माझ्याकडे परंपरागत आली आहे असे म्हणायलाही हरकत नाही.
संकलन : सुनील नांदगावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा