राज्यात शिंदे-फडणवीस सरकार विराजमान करण्यात मनसेने महत्वाची भूमिका बजावल्याने, मनसेचा एक आमदार असला तरी त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल” असे वक्तव्य मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज (शनिवार) कल्याणमध्ये केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालपासून मनसेमधील नेते अगोदर अंबरनाथमध्ये आणि आज कल्याणमध्ये सरकारमधील मंत्रिपदाबाबत उलटसुलट विधाने करत असल्याने नक्की मनसेची सरकार मधील सहभागा विषयी भूमिका काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
युवा नेते अमित ठाकरे शनिवारी कल्याणमध्ये दाखल झाले. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होणार का? असा प्रश्न केला. त्या प्रश्नाला बगल देत अमित यांनी “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल”असे मिश्कील शब्दात सांगत मनसेला शिंदे सरकारमध्ये स्थान मिळेल असे अप्रत्यक्ष सूचित केले. अमित यांनी अंबरनाथ दौऱ्यात मनसेला गृहमंत्रीपद मिळणार असेल तर या सरकारमध्ये सहभागी होऊ असे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडून अमित यांनी कल्याणमध्ये सरकारमधील सहभागा बद्दल हसत हसत भाष्य केल्याने त्यांच्या या विधानाला विशेष महत्व आले आहे.

हा चेहरा शिवसेना-भाजपाला निवडणूक काळात मोलाची मदत करणारा –

येत्या दोन दिवसात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांचे नाव मंत्रीमंडळ सहभागाबद्दल घेतले जात आहे. शहरी चेहऱ्या पेक्षा बहुजन समाजाला आकर्षित करण्यासाठी हा चेहरा शिवसेना-भाजपाला निवडणूक काळात मोलाची मदत करणारा असल्याने आमदार पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी घेतले जात आहे. त्याच अनुषंगाने अमित यांची कल्याण, डोंबिवलीतील वक्तव्ये महत्वाची मानली जात आहेत.

…हा काळ आता संपला आहे, नव्याने उभारी घेण्यासाठी आम्ही सज्ज –

गेल्या काही वर्षात मनसेतील अनेक कार्यकर्ते इतर पक्षांमध्ये गेले. यावर अमित म्हणाले, “काही भाग हा नशिबाचा असतो. प्रत्येकाला वाईट काळातून जावे लागते. कार्यकर्त्यांच्या जाण्याने पक्षाचे नुकसान झाले. हा काळ आता संपला आहे. नव्याने उभारी घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, तशी फौज आमच्याकडे आहे. ” असे अमित यांनी सांगितले.

१५० महाविद्यालयांमध्ये मनसे युनिटची उद्घाटने केली जाणार –

मनसेचा वर्धापनदिन १ ऑगस्टला आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील १५० महाविद्यालयांमध्ये मनसे युनिटची उद्घाटने केली जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी हे युनिट महत्वाचे भूमिका बजावेल, असा विश्वास अमित यांनी व्यक्त केला. मनसे विद्यार्थी सेनेची एक कार्यकारिणी तयार करून पदाधिकाऱ्यांचे मोबाईल शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी आहेत त्यांनी संपर्क केल्यास त्या सोडविल्या जातील, असे अमित यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I would like to work in raj sahibs cabinet amit thackerays statement msr
Show comments